महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत दोन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 झाली आहे. त्यातील एक जण कोरोनामुक्त झाला असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर उर्वरित 20 जण उपचार घेत आहेत.

corona in parbhani
corona in parbhani

By

Published : May 23, 2020, 12:52 PM IST

परभणी- आज नांदेड येथून प्राप्त झालेल्या अहवालात जिल्हा रुग्णालयात २ दिवासापूर्वी उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे महिलेच्या संपर्कातील 13 जणांना ताब्यात घेऊन त्यांचे स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, ही महिला जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे येथील रहिवासी असून, ती काही दिवसांपूर्वी मुंबईच्या वाशी भागातून आपल्या गावी परतली होती.

मृत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाकडून जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर गावात निर्जंतुकीकरणाचे काम सुरू झाले असून, हे गाव सील करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील वाशी भागातून जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे या आपल्या मूळ गावी आलेली ही 52 वर्षीय कोरोना संशयित महिला 20 मे रोजी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. मात्र, या महिलेचा उपचारादरम्यान त्याच दिवशी रात्री मृत्यू झाला. त्यानंतर या महिलेचे स्वॅब तपासणीसाठी नांदेड येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या संदर्भातील अहवाल शनिवारी मध्यरात्री जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. त्यामध्ये मृत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

या पार्श्वभूमीवर जिंतूरचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी सकाळीच गावाला भेट दिली. त्यानंतर महिलेच्या संपर्कातील 13 जणांना ताब्यात घेऊन त्यांचे स्वॅब घेण्याची प्रक्रिया आरोग्य विभागाने सुरू केली आहे. दरम्यान, याच अहवालात परभणी शहरातील पेडगाव रोड भागातील एका मुलीचा देखील स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 झाली आहे. त्यातील एक जण कोरोनामुक्त झाला असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर उर्वरित 20 जण उपचार घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details