परभणी -जिंतूर तालुक्यात बिबट्याचा अचानक मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. जिंतूर तालुक्यातील भोसी शिवारामध्ये हा नर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आहेत. वनविभागाकडून बिबट्याच्या मृत्यू मागील नेमक्या कारणाच शोध सुरू करण्यात आला आहे.
जिंतूर तालुक्यात मृतावस्थेत आढळला बिबट्या; भोसी शिवारात खळबळ - बिबट्याचा मृतदेह
जिंतूर तालुक्यात बिबट्याचा अचानक मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. जिंतूर तालुक्यातील भोसी शिवारामध्ये हा नर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. वनविभागाकडून बिबट्याच्या मृत्यूमागील नेमक्या कारणाच शोध सुरू करण्यात आला आहे.
भोसी शिवारातील मधुकर ठोंबरे यांच्या शेतातील आखाड्यावर बांधलेल्या एका वासराची अज्ञात हिंस्र प्राण्याने शिकार केल्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी तो प्राणी बिबट्याच असावा, असा अंदाज व्यक्त होत होता. याची तक्रारदेखील वन विभागाकडे आली होती. त्यावरून वन विभागातील कर्मचारी सदरील बिबट्याचा दोन दिवसापासून शोध घेत होते. त्यानंतर बिबट्याचा मृतदेह याच परिसरात सापडल्याने त्यानेच हे वासरू फस्त केल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी नेहमीप्रमाणे वन विभागातील कर्मचारी बी.आर. फरखंडे आणि कोल्हेवाड हे बिबट्याचा शोध घेत असताना ते मधुकर ठोंबरे यांच्या शेतातील नाल्याजवळ आले. तिथे त्यांना एक नर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देताच विभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी अमोल काशीकर, वनपाल गणेश घुगे, काशिनाथ भांडारे, वनरक्षक रेखा नरवाडे यांनी भोसी शिवारात धाव घेतली.
त्यानंतर मृत बिबट्या शहरातील वन विभाग कार्यालयात आणला असता, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस.जी. चव्हाण, परिचर डी.यु.राठोड, व्ही.ए. मोरे यांनी शवविच्छेदन केले. यात त्याचे सर्व अवयव जागेवर असल्याचे आढळून आले. हा बिबट्या दोन दिवसांपूर्वी मरण पावला असावा, असा अंदाज डॉ. चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. वन विभागाच्या कार्यालयाच्या आवारातच या बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.