परभणी- तालुक्यातील मुरुंबा गावात चार दिवसांपूर्वी बर्ड फ्लूमुळे सुमारे 800 कोंबड्यांच्या मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत पुन्हा याच परिसरातील अन्य पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. परिणामी हा संसर्गजन्य आजार पसरू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने या गावात कर्फ्यू लावला आहे. परिसरातील एक किलोमीटरच्या पोल्ट्री फार्मवरील सर्व कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
साधारणपणे 2 हजार 200 लोकसंख्या असलेले मुरुंबा हे गाव परभणीपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. या गावात 4 पोल्ट्रीफार्म असून, गावाला लागूनच असलेल्या देवठाणा येथे 1 पोल्ट्रीफार्म आहे.
दोन हजारांहून अधिक कोंबड्यांचा मृत्यू
दरम्यान, मुरुंबा या गावातील बाबुराव झाडे, सूलोचना झाडे, तारामती झाडे, संगीता चोपडे व देवठाणा येथे नामदेव खटिंग यांच्या पोल्ट्री फार्मवरील कोंबड्या चार दिवसांपूर्वी दगावल्या. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ते गोंधळून गेले. त्यानंतरही या पोल्ट्रीफार्ममधील कोंबड्यांचा एकामागून एक मृत्यू होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती देऊन पाहणी करण्यास सांगितले. त्यानंतर मृत कोंबड्यांचे नमुने घेऊन पुणे येथे तपासणीसाठी पाठविले. त्याचा अहवाल रविवारी (दि. 10 जाने.) रात्री प्राप्त झाला. त्यानुसार या सर्व कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, मुरुंबा गावातील 4 व शेजारीच्या देवठाणा येथील एका पोल्ट्रीफार्ममधली साधारणपणे दोन हजारांहून अधिक कोंबड्यांचा मागील चार दिवसात मृत्यू झाला आहे.