परभणी - धाकले पंढरपूर, अशी ओळख असलेल्या परभणी जिल्ह्यातील दैठणा येथे रविवारी एकादशीची परतवारी करून वारकऱ्यांनी आषाढीची यात्रा पूर्ण केली. सुमारे साडेतीनशे वर्षांपासूनची ही परंपरा अजूनही अखंडपणे सुरू आहे. दिवसेंदिवस या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. आज परतवारी निमित्त तब्बल ३० हजार भाविकांनी या ठिकाणच्या संत ठाकूर बुवा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन विठ्ठलाच्या दर्शनाची अनुभूती घेतली.
धाकल्या पंढरपूरच्या दर्शनाने वारकऱ्यांची आषाढी यात्रा पूर्ण, दैठणामध्ये भाविकांची गर्दी - फराळाचे खाद्य
धाकले पंढरपूर, अशी ओळख असलेल्या परभणी जिल्ह्यातील दैठणा येथे रविवारी एकादशीची परतवारी करून वारकऱ्यांनी आषाढीची यात्रा पूर्ण केली.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड रोडवर असलेल्या दैठणा या गावात पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या असंख्य दिंड्या मुक्कामी थांबतात. परंतु, परतवारीत या ठिकाणाला अधिक महत्त्व आहे. या ठिकाणच्या दत्त बुवासाहेब ठाकूर बुवा यांच्या समाधीचे दर्शन घेतल्याशिवाय आषाढी यात्रा पूर्ण होत नाही, अशी शेकडो वर्षांची परंपरा आहे. या परंपरेमुळेच संपूर्ण मराठवाड्यात दैठणा गावाची ओळख धाकले पंढरपूर, अशी झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी मराठवाड्यातील ४० ते ५० खेड्यातील भाविक परतवारीच्या दिवशी दर्शनाला गर्दी करतात. दत्त बुवासाहेब ठाकूर यांनी ३५० वर्षांपूर्वी ही परंपरा सुरू केली होती. पुढे त्यांचे शिष्य गुलाब बाबा फकीर यांनी या परंपरेला सुरू ठेवले. त्यानंतर धीरजगीर महाराज यांनी या परंपरेला आणि परतवारीच्या महोत्सवाला मोठे रूप प्राप्त करून दिले. त्यानुसार या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली.
त्यामुळे गावातील युवकांनी एकत्र येऊन येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनाची व फराळाची सोय उपलब्ध करून दिली. त्यामध्ये चहा, साबुदाणा खिचडी, फळे आदींची सोय केली जाते. 2 क्विंटलच्या साबुदाणापासून आज तब्बल ११ क्विंटलचा साबुदाणा आणि इतर फराळाचे तब्बल २० क्विंटल फराळाचे खाद्य या ठिकाणी वाटप केले जाते. यावेळी दैठणा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.