परभणी - गेल्या काही वर्षांत दुष्काळ शेतकऱ्याचा पिच्छा सोडायला तयार नाही. यावर्षीपेक्षा गत वर्षच चांगले होते, असे म्हणायची वेळ आली आहे. या वर्षीदेखील जिल्ह्यात लहरीपणाने बरसणारा वरुणराजा मागील 12 दिवसांपासून पुन्हा रुसला आहे. पेंडओलीवर केलेल्या पेरण्या कोवळी रोपे होऊन करपत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातूर होत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ 27.2 टक्केच पाऊस झाल्याने शेकऱ्यांसह सामान्य नागरिकांची चिंता वाढल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी 774.62 मीमी एवढी आहे. एक जूनपासून 24 जुलैपर्यंत 290 मीमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र, जून महिना जवळपास कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये झालेल्या तुरळक पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. परंतु, संपूर्ण मौसमात आतापर्यंत केवळ 147 मीमी पाऊस झाला. ही सरासरी अपेक्षित पावसाच्या केवळ 47 टक्के असून वार्षिक सरासरीच्या केवळ 27 टक्के आहे. परिणामी कोवळी पिके करपून जात आहेत. तर चारा आणि पिण्याच्या पाण्याचेही संकट गंभीर होत चालले आहे.
जिल्ह्यातील काही भागात पाऊस लहरीपणाने बरसला. त्यामुळे काही भागांत जूनमध्ये पेरण्या झाल्या तर काही भागांत जुलैमध्ये पेरण्या झाल्या. मात्र पाऊस मोठा कधीच झाला नाही. पेंड ओलीवर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. मात्र गत पंधरा दिवसांपासून पाऊस बंद आहे. दररोज कडक उन पडत असल्याने शेकरी हवालदिल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.