परभणी - जिल्ह्यातील पाथरी तालुका वगळता परभणी आणि इतर आठही तालुक्यांना सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाचा तडाखा बसला. गारपिटीसह बरसलेल्या या वादळी पावसात प्रामुख्याने काढणीला आलेले गहू, ज्वारी, हरभरा या पिकांसह संत्री आणि आंबा फळांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
हेही वाचा...जळगावात अवकाळी पावसाने केले केळीसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान, ३० हजार हेक्टर क्षेत्राला बसला फटका
एकीकडे कोरोनाच्या संकटाने सर्व नागरिक त्रस्त असतानाच दुसरीकडे बळीराजाला नैसर्गिक संकटाने घेरले आहे. काल (बुधावार) मध्यरात्री परभणी जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा देखील परभणी तालुक्यासह मानवत, सेलू, पालम, पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ आणि जिंतूर या तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात गारपिटीसह पाऊस बरसला.
परभणी तालुक्यातील महातपुरी मंडळात तब्बल १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर परभणी परिसरात ८.८ मिमी पाऊस पडला आहे. याशिवाय लिमला, ताडकळस आदी परिसरात देखील मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस झाल्याने आंबा आणि संत्री या फळांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय संपूर्ण जिल्ह्यात ज्वारी, गहू तसेच हरभऱ्याचे पीक अक्षरशः शेतात आडवे झाले आहे. काढणीला आलेली ही पिके जमीनदोस्त होत असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.