परभणी- सामान्य नागरिकांना त्रास देणे, महिलांची छेड काढणे, बलात्कार करण्यासह मारहाण व घातक शस्त्र बाळगणाऱ्या तसेच अनेकांना जीवे मारण्याच्या धमकी देणाऱ्या टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी हद्दपार केले आहे. या टोळीच्या कारनाम्यांचा अहवाल गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या वतीने सादर करण्यात आला होता.
परभणीच्या पोलीस अधीक्षकांनी केली टोळी हद्दपार; चार तालुक्यात होती दहशत - परभणी क्राईम बातम्या
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पालम तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील अहमदपूर व बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात या टोळीची दहशत निर्माण झाली होती. या तीन जणांच्या टोळीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हद्दपार करण्याची कारवाई केल्याने सामान्य नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
टोळीप्रमुख विलास ज्ञानोबा मुंडे याच्यासह मंगेश शिवाजी मुंडे, बालाजी वैजनाथ मुंडे अशी या टोळीतील सदस्यांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक मीना यांनी दिलेल्या आदेशानंतर पिंपळदरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी अंबाजोगाई येथे नेऊन सोडले.
तीन जिल्ह्यातील चार तालुक्यात होती दहशत
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पालम तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील अहमदपूर व बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात या टोळीची दहशत निर्माण झाली होती. या तीन जणांच्या टोळीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हद्दपार करण्याची कारवाई केल्याने सामान्य नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
2013 पासून होती दहशत
या टोळीने सुरुवातीला पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत व इतरत्र वर्चस्व निर्माण केले. टोळीप्रमुख विलास ज्ञानोबा मुंडे याच्यासह मंगेश शिवाजी मुंडे, बालाजी वैजनाथ मुंडे यांच्यावर नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण करून त्यांची जीवित किंवा व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात आणणार्या कृतीने दुखापत पोचविणे, महिलांची छेड काढणे, महिला, मुलींवर बलात्कार करणे, जीवे मारण्याच्या उद्देशाने घातक शस्त्राने मारहाण करून गंभीर जखमी करणे, घातक शस्त्रानिशी फिरणे, जीवे मारण्याची धकमी देणे, गैरकायद्याची मंडळी जमवून शस्त्र जवळ बाळगून दुखापत करणे, घरफोडी, चोरी आदी गंभीर गुन्हे आहेत. 2013 पासून आजतागायत टोळीतील सदस्यांनी दहशत निर्माण केली होती. या टोळीविरूध्द 9 गंभीर गुन्हे दाखल असून नवनवीन सदस्यांना टोळीमध्ये घेऊन गुन्हे करण्याचे त्यांचे कृत्य अव्याहतपणे चालू होते.
हद्दपारीची कारवाई सुरू असतानाही केले गुन्हे
या टोळीविरूध्द हद्दपार प्रकरणाची सुनावणी चालू असताना देखील टोळीप्रमुख विलास ज्ञानोबा मुंडे आणि टोळी सदस्य मंगेश शिवाजी मुंढे यांनी अदखलपात्र गुन्हे देखील घडवून आणले होते. या सर्व घटनांवरून टोळीप्रमुख व त्याच्या टोळीस कायद्याचा आदर व भिती न राहिल्याने त्यांच्याविरूध्द हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. दरम्यान, जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्या निष्पन्न करून त्यांच्याविरूध्द कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशा गुन्हेगार गुंडांविरूध्द हद्दपार, एमपीडीए, मोक्का कायद्याअंतर्गत कारवाया करून गुन्हेगार टोळ्यांचा व सारईत गुन्हेगारांचा बिमोड करण्यात येईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी म्हटले आहे.