परभणी -जिल्हा रुग्णालयातून गंगाखेड येथील कोरोनामुक्त झालेल्या महिलेऐवजी त्याच आडनावाच्या पूर्णा परिसरातील कोरोनाबाधित महिलेला डिस्चार्ज देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घरी परतलेल्या महिलेचे नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी डिस्चार्ज मिळाल्यानंतर स्वागतही केले. मात्र, संबंधित प्रकार उघडकीस येताच आरोग्य प्रशासनाने पुन्हा महिलेला परत बोलावून संक्रमित कक्षात दाखल केले आहे. या धक्कादायक प्रकाराची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती नेमली असून त्याबाबत आज संध्याकाळी अहवाल येणार आहे.
जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णाला अर्धा तास मागणी केल्यानंतरही ऑक्सिजन न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेला दोन दिवस उलटत नाही, तोच आणखी एक बेजबाबदारपणा समोर आला आहे.
पूर्णेतील एक महिला 18 जुलै रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या महिलेचे स्वॅब तपासल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे संबंधित महिलेवर उपचार सुरू होते. या दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने महिलेस बुधवारी दुपारी अचानक डिस्चार्ज दिला. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला वाहनाद्वारे घरी नेले. विशेष म्हणजे त्या परिसरातील उत्साही नागरिकांनी या महिलेच्या गाठीभेटी घेतल्या; तिचे स्वागत केले.
हे सत्र सुरू असताना काही जागरूक नागरिकांना पॉझिटिव्ह असणाऱ्या महिलेस तीनच दिवसांत डिस्चार्ज कसा मिळाला, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर हा गोंधळ निदर्शनास आला. तेव्हा त्याच कक्षात आडनावात साधर्म्य असणारी गंगाखेडातील एक महिला उपचार घेत होती. त्या महिलेचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. आडनाव सारखे असल्याने निगेटिव्ह महिलेऐवजी पॉझिटिव्ह महिलेला डिस्चार्ज मिळाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.