महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अर्धा तास उशिरा पोहोचल्यानं न्यायालयानं २ पोलिसांना ठोठावली गवत काढण्याची शिक्षा, पोलीस अधीक्षकांनी दिलं वरिष्ठ न्यायाधीशांना पत्र

Court Punished To Police : मानवत पोलीस ठाण्याचे हवालदार आणि शिपाई अर्धा तास उशिरा न्यायालयात अहवाल घेऊन पोहोचले. न्यायालयात नियोजित वेळेपेक्षा विलंबाने आल्याबद्दल पोलिसांना न्यायाधीशांनी गवत काढण्याची शिक्षा दिली.

Court Punished To Police
संग्रहित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2023, 11:07 AM IST

Updated : Nov 22, 2023, 2:59 PM IST

छत्रपती संभाजीनगर Court Punished To Police : न्यायालयात अर्धा तास उशिरा पोहोचलेल्या दोन पोलिसांना न्यायालयानं गवत काढायची शिक्षा ठोठावल्यानं मोठी खळबळ उडाली. ही शिक्षा परभणी इथल्या न्यायालयानं ठोठावली आहे. मानवत पोलीस ठाण्यातील हवालदार आणि पोलीस शिपायाला ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

न्यायाधीशांनी मानवत पोलीस ठाण्याच्या हवालदार आणि शिपायाला न्यायालयात पोहोचण्यास उशीर झाला म्हणून गवत काढण्याची शिक्षा ठोठावली होती. ती पोलीस कर्मचाऱ्यांनी भोगलीही आहे. मात्र रात्री गस्तीवर असताना पोलिसांना न्यायालयात पोहोचण्यास उशीर झाला होता. पोलिसांनी पकडलेल्या संशयितास 24 तासात न्यायालयात हजर करावं लागतं. त्यामुळे रात्री गस्तीवर असतानाही मानवत पोलीस ठाण्याचे कर्मचारी संशयिताला घेऊन न्यायालयात पोहोचले. त्यामुळे या प्रकरणी वरिष्ठ न्यायाधीशांना पत्र देण्यात आलं आहे. उच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीशांनाही पत्र दिलं आहे. - रगसुधा आर, जिल्हा पोलीस अधीक्षक, परभणी

काय आहे प्रकरण : मानवत पोलीस ठाण्यातील हवालदार आणि पोलीस शिपाई 22 ऑक्टोबरला रात्रीच्या गस्तीवर होते. त्यांनी रात्री मानवत इथं दोन संशयिताना संशयास्पद फिरताना ताब्यात घेतलं होतं. त्याची नोंद त्यांनी पोलीस ठाण्याच्या डायरीत केली होती. ताब्यात घेतलेल्या संशयित व्यक्तीला 24 तासाच्या आत न्यायालयात हजर करणं बंधनकारक असते. त्यामुळे सुट्टीचा दिवस असल्यानं पोलिसांनी न्यायाधीशांची वेळ घेतली. यावेळी न्यायालयानं सकाळी अकरा वाजताची वेळ दिली होती. मात्र रात्री कर्तव्यावर असल्यानं पोलिसांना सकाळी न्यायालयात या पोहोचण्यास अर्धा तास उशीर झाला. त्यामुळे न्यायाधीशांनी पोलिसांना उशिरा न्यायालयात आल्यानंतर चांगलचं खडसावलं.

न्यायालयानं ठोठावली गवत काढण्याची शिक्षा :पोलीस हवालदार आणि शिपाई न्यायालयात अर्धा तास उशिरा दाखल झाले. न्यायालयात अर्धा तास उशिरा आलेल्या पोलिसांना न्यायाधीशांनी जाब विचारला. यावेळी न्यायाधीशांनी त्यांना गवत काढण्याची शिक्षा ठोठावली. न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना गवत काढण्यासाठी विळे आणून दिले. त्यामुळे पोलीस हवालदार आणि पोलीस शिपायानं न्यायालय परिसरातील गवत काढून न्यायाधीशांनी ठोठावलेली आपली शिक्षा पूर्ण केली. मात्र रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशीर झाल्यानं गवत काढण्याची शिक्षा केल्यानं पोलीस वर्तुळात चर्चांना उधाण आलं.

वरिष्ठ न्यायाधीशांना दिलं पत्र : पोलिसांनी 22 ऑक्टोबरच्या रात्री गस्तीवर असताना दोन संशयित व्यक्ती आढळून आले होते. त्यामुळे मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आणि पोलीस शिपायानं त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. संशयास्पद व्यक्ती असल्यानं पोलिसांनी त्यांना भारतीय दंड विधान 122 नुसार पोलीस डायरीवर नोंद घेऊन त्यांना न्यायालयात हजर करण्याची तयारी केली. मात्र सुट्ट्यांचा कालावधी असल्यानं पोलिसांनी न्यायाधीशांकडून वेळ मागितली. न्यायाधीशांनी त्यांना सकाळी 11 वाजताची वेळ दिली. पण रात्री गस्तीवर असल्यानं पोलिसांना सकाळी न्यायालयात जाण्यास अर्धातास उशीर झाला. त्यामुळे संतापलेल्या न्यायाधीशांनी त्यांना गवत काढण्याची शिक्षा दिली. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षा भोगल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक रगसुधा आर यांनी वरिष्ठ न्यायाधीशांना याप्रकरणी पत्र दिल्याचं सांगितलं आहे. त्यासह त्यांनी उच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीशांनाही याबाबत पत्र दिल्याचं ईटीव्ही भारतला सांगितलं आहे.

हेही वाचा :

  1. मैत्रिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला अश्लील मेसेज पाठवायचा, न्यायालयाने लावला समुद्रकिनारा स्वच्छ करायला..
  2. Unique Punishment: पाच तरुणांना वृद्धाश्रमात जाऊन सहा महिने सेवा करण्याची शिक्षा
  3. Unique Punishment : रस्त्यातल्या भांडणासाठी कोर्टाने दिली अनोखी शिक्षा, झाडे लावण्याचा दिला आदेश, 5 वेळा करावे लागणार नमाज पठण
Last Updated : Nov 22, 2023, 2:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details