परभणी - 'कोरोना विषाणू'चा सामना करण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीत बेशिस्त वागणे गंगाखेडच्या तीन जणांना महागात पडले आहे.
एका ऑटो चालकाला सात प्रवाशांना बसवून परळी रोडने जात असताना पकडून पोलिसांनी त्याच्यावर कलम 144 अंतर्गत गुन्हा दाखल केला. तर शहरातील किराणा दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी जमवून सामानाची विक्री करणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिवाय रात्री लॉज उघडी ठेवणाऱ्या लॉज चालकाविरुद्ध देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
परभणी जिल्ह्यात अद्याप कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नसला तरी संशयित मात्र मोठ्या प्रमाणात जिल्हा रुग्णालय तसेच तालुक्यांच्या आरोग्य केंद्रांमध्ये दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हात देखील संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीचे कायदे देखील कडक करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर कोणीही गर्दी जमा करता कामा नये, अशा कडक सूचना आहेत. असे असताना देखील काल मंगळवारी सायंकाळी पाच वाजता ऑटोचालक मारुती तांदळे हा त्याच्या ऑटोमध्ये तब्बल 7 प्रवासी बसवून त्यांना कोदरी रोडने परळीकडे नेत होता. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी त्याला अडवून त्याच्यावर कलम 144 अंतर्गत गुन्हा दाखल केला.