परभणी - गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे सर्वत्र अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र, आता कोरोनाची लस उपलब्ध झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील आणि 'कोरोना' काळात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना ही लस वाटप केली जात आहे. आज परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ही लस घेतली.
माहिती देताना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर दुष्परिणाम तात्पुरते
जिल्हा रुग्णालयात झालेल्या लसीकरण मोहिमेत आज जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी परिचारिकेच्या हातून लस टोचून घेतली. यावेळी मुगळीकर म्हणाले, अत्यंत हलक्या असलेल्या या लसीमुळे कुठलाही त्रास होत नाही. शिवाय काही किरकोळ स्वरुपाचे दुष्परिणाम असले तरी ते तात्पुरते आहेत. त्यामुळे, घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. या लसीमुळे कोरोनाच्या संसर्गापासून 70 ते 80 टक्के संरक्षण होत असल्याने प्रत्येकाने ही लस घेणे आवश्यक आहे. फ्रंटलाईन वर्कर म्हणून ही लस सध्या आम्ही आणि आरोग्य विभागातील कर्मचारी घेत असलो तरी येणाऱ्या काळात टप्प्याटप्प्याने सर्व जनतेपर्यंत ही लस पोहोचणार आहे. त्यामुळे, सर्वांनी ही लस टोचून घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले.
हेही वाचा -गृहमंत्र्यांनंतर देवेद्र फडणवीसांचेही पॅरोलवर सुटलेल्या आरोपी सोबत छायाचित्र
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश सुरवसे, डॉ. धुतमल आदींसह इतर डॉक्टर्स आणि परिचारिका उपस्थित होत्या.
आतापर्यंत 2 हजार 464 कोरोना योद्ध्यांचे लसीकरण
परभणी जिल्ह्यातील कोरोना योद्ध्यांसाठी 9 हजार 30 लसीची उपलब्धता झाली आहे. पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट येथून ही लस प्राप्त झाली असून, गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यातील 8 आरोग्य केंद्रांवर या लसीचे वाटप केले जात आहे. या अंतर्गत 29 जानेवारीपर्यंत 2 हजार 464 कोरोना योद्ध्यांना ही लस देण्यात आली. त्यानंतर आज लसीकरणाच्या पुढील टप्प्यात उर्वरित कोरोना योद्ध्यांचे लसीकरण केले जात आहे. यामध्ये जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे.
विशेष बाब म्हणजे, आतापर्यंत 1 हजार 751 महिलांनी ही लस टोचून घेतली, तर केवळ 713 पुरुषांनी ही लस टोचून घेतल्याने कुठेतरी पुरुषांमध्ये या लसीची भीती अजूनही कायम असल्याचे दिसून येते.
42 रुग्णांवर उपचार सुरू
जिल्ह्यात सध्या 42 कोरोनाग्रस्त रुग्ण असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 हजार 981 कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी 7 हजार 624 कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. तर, 315 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, गेल्या 24 तासात 5 कोरोना रुग्ण आढळून आले असून, 6 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र, एकाही रुग्णाचा या दरम्यान मृत्यू झालेला नाही. एकूणच जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती सध्या आटोक्यात असल्याने दैनंदिन व्यवहार सुरळीत झाल्याचे दिसून येते.
हेही वाचा -धक्कादायक...! व्हॉट्सअॅपला स्टेटस ठेऊन परभणीच्या शेतकऱ्याची आत्महत्या