परभणी- आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या अनुषंगाने आज (शुक्रवारी) परभणी जिल्ह्यातील चार आरोग्य केंद्रांवर रंगीत तालीम (ड्रायरन) पार पडली. परभणीतील 3 ठिकाणांसह सेलू येथील रुग्णालयात यासाठीचे प्रात्येक्षिक घेण्यात आले. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात स्वतः जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी उपस्थित राहून सर्व व्यवस्थेचा आढावा घेतला.
कोरोना लसीकरणासाठी परभणीत 4 ठिकाणी पार पडली रंगीत तालीम - कोरोना ड्राय रन परभणी
कोरोना लसीकरणाच्या अनुषंगाने आज (शुक्रवारी) परभणी जिल्ह्यातील चार आरोग्य केंद्रांवर रंगीत तालीम (ड्राय रन) पार पडली. परभणीतील 3 ठिकाणांसह सेलू येथील रुग्णालयात यासाठीचे प्रात्येक्षिक घेण्यात आले.
गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गाने संपूर्ण जगाला भंडावून सोडले आहे. शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नानंतर या संसर्गजन्य आजारावर अखेर उपाय शोधून काढण्यात भारताला देखील यश आले आहेत. भारतातील दोन लसींना औषध महानियंत्रकांकडून मान्यता देण्यात आली असून, हे लसीकरण आगामी काळात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवारी) परभणीसह महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांमध्ये या लसीकरण मोहिमेची रंगीत तालीम करण्यात आली.
'जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन दिली माहिती -
या लसीकरण मोहिमेच्या रंगीत तालमी विषयी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी माध्यमांना माहिती दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे परभणी जिल्ह्यातील चार आरोग्य केंद्रांमध्ये ही रंगीत तालीम पार पडली. आगामी काळात नागरिकांना शासनाने विकसित केलेल्या कोरोना संदर्भातील ॲपवर जाऊन आपली नाव नोंदणी करायची आहे. त्यानंतर त्यांना त्यांच्या मोबाईलवर वेळ आणि ठिकाण कळवल्या जाणार आहे. त्यानुसार नागरिकांनी त्या ठिकाणी जाऊन लसीकरण करून घ्यायचे आहे. संबंधित आरोग्य केंद्रांवर नागरिकांनि केलेल्या ॲप वरील नोंदणीची पडताळणी करून त्यांना लस दिली जाणार आहे. त्यानंतर लसीकरण झालेल्या नागरिकांना अर्ध्या तासासाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असून, ही संपूर्ण प्रक्रिया साधारणपणे चाळीस मिनिटात पूर्ण होणार आहे. त्याप्रमाणेच आज (शुक्रवारी) परभणी जिल्ह्यातील 4 केंद्रांवर प्रत्येकी 25 लाभार्थ्यांना लस देण्याचे प्रात्यक्षिक पार पडल्याचे ते म्हणाले.
'या' ठिकाणी झाली रंगीत तालीम -
सदर रंगीत तालीम परभणी जिल्हा रुग्णालय, सेलू येथील उपजिल्हा रुग्णालय, परभणी तालुक्यातील जांब प्राथमीक आरोग्य केंद्रावर आणि जायकवाडी परिसरातील महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात सकाळी 11 वाजेच्या सुमारास सुरु झाली. त्यानंतर सुमारे 2 ते 3 तास ही प्रक्रिया चालली. या प्रत्येक केंद्रावर 25 लाभार्थींना लस देण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. शहरातील महानगर पालिकेच्या उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर, महानगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांची उपस्थिती होती. तर जिल्हा रुग्णालयातील प्रात्यक्षिकास जिल्हा अधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासह जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकरराव देशमुख, माता व बालसर्वेक्षण अधिकारी डॉ. गणेश सिरसूलवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे यांच्यासह आरोग्य अधिकारी, परिचारक, परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.