परभणी - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जास्तीत जास्त तपासण्या होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आता परभणीतच कोरोनाची तपासणी होणार आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयात आणि शहरातील सिसोदिया पॅथॉलॉजी लॅबच्यावतीने उपलब्ध करुन देण्यात आलेल्या मशिनरीच्या माध्यमातून या लॅबची निर्मिती झाली आहे. मशीनची फिटिंग झाली असून, येत्या 2 दिवसातच प्रत्यक्ष कामाला देखील सुरूवात होणार आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यातील संभाव्य रुग्णांच्या तपासण्या याच ठिकाणी अगदी तासात होतील.
आता परभणीतच होणार 'कोरोना' चाचणी सध्या परभणी जिल्ह्यात सामान्य रुग्णालय किंवा तालुकास्तरावरील रुग्णालयातून संशयीत रुग्णांचे स्वॅब घेतले जात आहेत. तेथून ते पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या प्रयोगशाळेकडे खास वाहनाद्वारे पाठवले जात होते. त्यानंतर दोन दिवस अहवालाची प्रतिक्षा करावी लागत होती. या प्रक्रियेत मोठा विलंब, खर्चसुध्दा होत होता. त्या पार्श्वभूमीवर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनामार्फत राज्य सरकारकडे प्रयोगशाळेसंदर्भात एक प्रस्ताव दाखल केला होता. परंतू, त्या संदर्भात ठोस निर्णय झाला नाही.
डॉ. बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा शल्य चिकित्सक आणि डॉ.किरण सगर, वैद्यकीय अधिकारी दरम्यान, आरोग्य विभागाने औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेत सुविधा उपलब्ध केल्यानंतर पुण्याऐवजी औरंगाबादला संशयित रुग्णांचे स्बॅव पाठवले जात होते. तेथून येणाऱ्या अहवालासाठी देखील दोन दिवस प्रतिक्षा करावी लागत होती. त्यानंतर नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेत स्वॅबच्या चाचण्या सुरु झाल्यामुळे दीड दिवसात संशयीत रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल प्राप्त होवू लागले. मात्र, त्यासाठी देखील वाहन खर्च आणि वेळेचा अपव्यय होत होता. त्यामुळे परभणीच्या जिल्हा रुग्णालयातच कोरोना संशयीत रुग्णांच्या स्वॅबची चाचणी घेण्याची सोय रुग्णालयातील काही यंत्र तसेच शहरातील शिसोदिया पॅथॉलॉजी लॅबने उपलब्ध केलेल्या मशिनरीमुळे शक्य झाली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञांच्या मदतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण सगर यांनी चाचण्यांच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.
नांदेडच्या प्रयोगशाळेने काही स्वॅब परभणी जिल्हा रुग्णालयाकडे ट्रायल स्वरूपात तपासणीसाठी पाठविले आहेत. त्या स्वॅबच्या चाचणासंबंधीचे काम सुरू झाले आहे. तसेच यासाठी नागपूर येथील एम्सने देखील हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे काही तपासण्या यशस्वी होताच आरोग्य विभागाद्वारे या लॅबला रितसर परवानगी मिळेल. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत या ठिकाणी चाचण्या सुरू होतील, असा विश्वास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी व्यक्त केला आहे. तर ही लॅब कार्यान्वित झाल्यानंतर परभणी जिल्ह्यातील साधारण 30 संभाव्य रुग्णांची चाचणी दररोज करता येईल, अशी माहिती डॉ. सगर यांनी दिली.