परभणी - सर्व शिक्षकांमार्फत परभणी शहरातील सर्व घरे आणि नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यात 50 वर्षावरील आणि 10 वर्षाखालील वयाच्या सर्व नागरिकांंची आशा स्वयंसेविका आणि एएनएम मार्फत वैद्यकीय तपासणी होणार आहे. यात दमा, रक्तदाब, मधुमेह आणि इतर गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींची कोरोना तपासणी देखील केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त देवीदास पवार यांनी दिली आहे.
परभणी शहरात गेल्या दीड महिन्यांपासून सातत्याने कोरोनाबाधितांची संख्येत वाढ होत असून प्रशासनासाठी ही चिंतेची बाब बनली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या जात आहेत. याच उपाययोजनांची माहिती देण्यासाठी आज (सोमवारी) महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना, 'परभणी शहरामध्ये महानगरपालिकाचे 8 आरोग्य केंद्र आणि नोंदणीकृत 139 खासगी रुग्णालये ही नॉन कोविड रुग्णालये म्हणून निश्चित करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये इतर आजारांचे रुग्ण, गरोदर माता व बालकांच्या सेवा, असंसर्गिक आजार इत्यादीसाठी सेवा सुरु आहेत. तसेच 16 केंद्रांवर अँटिजेन रॅपिड तपासणी होत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
परभणी महापालिका आयुक्त देवीदास पवार यांची प्रतिक्रिया... हेही वाचा -कोरोनामुळे राज्यात 126 पोलिसांचा मृत्यू, तर 9929 पोलीस कोरोनामुक्त
बाहेर जिल्ह्यातून येणार्या नागरिकांसाठी शहरातील प्रमुख 3 नाक्यांवर बापू सेवाभावी संस्थेमार्फत वैद्यकीय तपासणी पथके कार्यरत करण्यात आलेली आहेत. त्यांच्यासोबत रोड सेफ्टी पायलटचे नागरिक पथक, माध्यमिक शिक्षक पथक आणि महानगरपालिका कर्मचारी पथक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच जे नागरिक मास्कचा वापर करत नाहीत, त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत आहे. शहरामध्ये मास्क न वापरणार्या, भाव फलक न लावणार्या विक्रेते, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणार्रे विक्रेते आणि नागरिकांवर महानगरपालिकेतर्फे दंडात्मक कार्यवाही करून दंड आकरण्यात आलेला आहे.
त्यासोबतच पोस्टर वाटप करून आणि समुपदेशन करून जनजगृती करण्यात येत आहे. कॉन्ट्रक्ट ट्रेसिंग करिता श्रेणी 1 अधिकारी पासून वर्ग 4 कर्मचारी पर्यंत, असे एकूण 16 प्रभाग निहाय 16 पथके नियुक्त करण्यात आले आहेत. दरम्यान, 20 मोक्याच्या ठिकाणी 10 मराठी व 10 उर्दू होर्डिंग लावण्यात आले आहेत. मोठे हास्पिटल व महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 50 ठिकाणी बॅनर लावण्यात आले.
एएनएम आणि आशा स्वयंसेविकांमार्फत घरोघरी पोस्टर वाटप करण्यात आले. 72 घंटागाडीवरून उद्घोषणा केल्या जात आहेत. एनयुएलएम आणि बचतगटाच्या माध्यमातून शहरात माउथ टू माउथ जनजागृती करण्यात आला आहे. शहरातील बारा बलुतेदार गोंधळी, वासदेव, फकीर, बहुरूपी इत्यादी लोककलावंतांनी एकूण 54 पथकांमार्फत लोकगीतांच्या माध्यमातून शहरातील 16 प्रभागात कोरोनाविषयी बचाव कसा करावा, प्रतिबंधात्मक कोणकोणत्या गोष्टींचे पालन करावे याबाबत जनजागृती करत आहोत. यामध्ये प्रामुख्याने फिजिकल डिस्टन्सिंग, वारंवार हात स्वच्छ धुणे, आवश्यकता असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, आदी जनजागृती करण्यात येत असल्याचेही आयुक्त पवार म्हणाले.