परभणी - दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या सेलू येथील महिलेला कोरोना झाल्यानंतर तिचा नांदेड येथे गुरुवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही महिला आजारी पडल्यानंतर सेलू येथे दोन दिवस वास्तव्याला होती. तर परभणीतील एका खाजगी रुग्णालयात काही काळ थांबून तिला नांदेड येथे हलविण्यात आले होते.
सील करण्यात आलेले रुग्णालय दरम्यान, या पार्श्वभूमीवर परभणी आणि सेलू येथील 51 व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब सकाळीच तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर, सेलूमध्ये दोन दिवसांची संचारबंदी लावण्यात आली आहे. मात्र, आता महिलेचा मृत्यू झाल्याने परभणी जिल्हा पुन्हा एकदा अलर्ट झाला आहे.
सदर 55 वर्षीय महिलेला 4 महिन्यांपूर्वी औरंगाबाद येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, 27 एप्रिल रोजी ती सेलू येथे परतली होती. परंतू तिला अस्वस्थ वाटत असल्याने कुटूंबियांनी 28 एप्रिल रोजी परभणीतील मोंढा भागातील एका खाजगी रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले होते. मात्र, प्रकृती खालावल्याने तेथून नांदेडला हलविण्यात आले. त्या ठिकाणीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिचे स्वॅब घेतले, तेव्हा ती महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. त्यामुळे नांदेडच्या आरोग्य विभागाने त्या महिले सोबतच्या दोन मुलांना लगेच क्वॉरंटाईन केले.
तर इकडे नांदेड जिल्हा प्रसासनाने कळवल्यानंतर सेलूतील तिच्या कुटूंबातील 8 व त्यांच्या संपर्कात आलेल्या 23 जणांनाही क्वॉरंटाईन करण्यात आले. शिवाय ही महिला परभणीच्या ज्या खाजगी रुग्णालयात दोन तास उपचारासाठी थांबली होती. ते रुग्णालय सील करून निर्जंतुक करण्यात आले. तसेच, या रुग्णालयातील 20 लोकांनादेखील क्वारन्टाईन करण्यात आले आहे. त्यानुसार एकूण 51 व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांच्या अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून परभणी जिल्हा पुन्हा एकदा अलर्ट झाला आहे.