परभणी -जिल्ह्यात मुंबई येथून दोन दिवसांपूर्वी परभणीत परतलेल्या महिलेचा अहवाल आज(रविवार) सकाळी पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत रविवारी दुपारी सदर महिला राहत असलेल्या मिलिंद नगर आणि परिसरातील अन्य काही नगर, कॉलन्यांचा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. त्यानुसार संपूर्ण भाग सील करण्यात आला असून या भागाचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे.
शहरातील मिलिंद नगर भागात राहणारी 50 वर्षीय महिला दोन दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबांसह मुंबई येथून परभणीत परतली. मात्र तिला ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने परभणीच्या जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले होते. या ठिकाणी डॉक्टरांना संशय आल्याने तिला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. आज (रविवार) सकाळी साडेदहा वाजता सदर महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे.
मार्च महिन्याच्या 16 तारखेला परभणीत एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. तेव्हापासून परभणी शहरात एकही रुग्ण नव्हता. मात्र, त्यानंतर जिंतूरात तीन दिवसांपूर्वी तीन रुग्ण आढळून आले. त्यानंतर आज (रविवार) सदर महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. यामुळे परभणीत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर सदर महिला वास्तव्यास असलेल्या मिलिंद नगर आणि परिसरातील काही कॉलन्यांचा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. त्यानुसार या भागात महापालिकेकडून निर्जंतुकीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. शिवाय या भागातील नगरं आणि मुख्य रस्ते लाकडी बॅरिकेटच्या माध्यमातून बंद करण्यात येत आहेत.
दरम्यान परभणीत महाराष्ट्र शासनाने जाहीर करण्यापूर्वी 25 मेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. सध्या रेड झोनमधून येणाऱ्या नागरिकांच्या लोंढ्यांचा प्रभाव परभणीत दिसून येत आहे. तर, पुणे, मुंबईतून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असल्याने परभणीकरांना आता अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.