परभणी - जिल्ह्यात सोमवारी बारावी जीवशास्त्र आणि तत्त्वज्ञान विषयाची परीक्षा पार पडली. या परीक्षेत तब्बल 51 कॉपीबहाद्दरांना रंगेहात पकडण्यात आले. परभणी, गंगाखेड, सोनपेठ व पाथरी तालुक्यातील 6 महाविद्यालयांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
बारावीच्या जीवशास्त्र आणि तत्त्वज्ञान विषयाच्या परिक्षेदरम्यान कॉपी करणाऱ्या 51 विद्यार्थ्यांवर कारवाई... हेही वाचा...प्रेम न करण्याची शपथ घेतलेल्या कॉलेजमधील विद्यार्थिनीचा 'प्रेमविवाह'
कॉपीवर आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने कितीही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, तरीही अनेक ठिकाणी कॉपीचे गैरप्रकार सुरु आहेत. परभणी तालुक्यात बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या परीक्षेत शिक्षकांनीच उत्तरे सांगितल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे शिक्षण विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले. बैठ्या तसेच भरारी पथकांना कारवाईच्या कडक सूचना देण्यात आले. तरी देखील यापूर्वीही भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयाच्या परीक्षेदरम्यान तब्बल 68 कॉपीबहाद्दरांना पकडून त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती. तर रसायनशास्त्र आणि वाणिज्य संघटन या विषयाच्या परीक्षेत 15 कॉपीबहाद्दरांना पकडून त्यांना निलंबित करण्यात आले.
हेही वाचा...खळबळजनक! प्रेयसीवर भर रस्त्यात चाकूने वार करून प्रियकराचा स्वतःच्या गळ्यावर वार
आज (सोमवारी) परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालयात जीवशास्त्र विषयाच्या परीक्षेत 1 तर परभणी तालुक्यातील लोहगावच्या नृसिंह उच्च माध्यमिक विद्यालयात तत्त्वज्ञान परीक्षेदरम्यान 13 विद्यार्थ्यांना पकडण्यात आले. याशिवाय जीवशास्त्र परीक्षेच्या दरम्यान गंगाखेड तालुक्यातील कोद्रीच्या महात्मा फुले महाविद्यालयात 15 आणि महातपुरीच्या कै. रामकृष्णबापू उच्च माध्यमिक विद्यालयात तब्बल 20 कॉपीबहाद्दरांना रंगेहात पकडण्यात आले. याशिवाय सोनपेठच्या महालिंगेश्वर महाविद्यालयात 1 आणि पाथरी तालुक्यातील रेखाजी नाईक महाविद्यालयाच्या 2 विद्यार्थ्यांना रंगेहात पकडून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, सोमवारी बारावीची जीवशास्त्र, पुस्तपालन, लेखा काम व तत्वज्ञान या विषयांची परीक्षा अनुक्रमे जिल्ह्यातील 55 आणि 20 केंद्रांवर घेण्यात आली. यात अनुक्रमे सकाळ आणि दुपारच्या सत्रात 11 हजार 128 आणि 779 परीक्षार्थींनी परीक्षा दिली. या सर्वच परीक्षा केंद्रांवर बैठे पथक तैनात होते. तर 33 भरारी पथकांनी जवळपास सर्वच केंद्रांवर भेटी देऊन तपासणी केल्यानंतर हे 51 कॉपीबहाद्दर आढळून आले आहेत.