परभणी -जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाच्या वतीने प्रत्येक महिन्याला तपासण्यात येणाऱ्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये 127 गावांमधील पाणी दूषित आढळून आले आहे. ज्यामुळे लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात दूषित पाणी आढळल्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून, उपाययोजना सुरू केल्या आहेत.
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात सार्वजनिक पाणी पुरवठा स्त्रोत्रांची तपासणी आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेत करण्यात येते. त्यानुसार ऑक्टोंबर महिन्यात देखील पाण्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये 131 प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावांमध्ये घेतलेल्या 538 नमुन्यांच्या तपासणीमध्ये 95 नमुने दूषित आढळले आहेत. तर लघु प्रयोगशाळेत 332 नमुने तपासण्यात आले, ज्यामध्ये 40 नमुने दूषित आढळले. एकूण 915 नमुन्यांपैकी 135 पाण्याचे नमुने दूषित आहेत.एकूण 15 टक्के पाणी दूषित असल्याचे यातून पुढे आले आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे. नागरिकांचे आरोग्य किती सुरक्षित आहे, हे यावरून स्पष्ट होते.