परभणी- परभणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार केली आहे. मंगळवारी रात्री उशिरा जाधव यांनी स्वतः नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
दोन कोटी रुपयांची सुपारी-
या संदर्भात खासदार जाधव यांनी 'माझ्या जीवाला धोका असून, आपल्याला सुपारी देऊन जीवे मारण्याचा कट रचण्यात येत असल्याची तक्रार स्वतः परभणी येथील नानलपेठ पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा दिली. तसेच 'आपल्याला दोन दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकीही दिली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच यासाठी परभणीतून दोन कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.