परभणी - जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे जिल्हा प्रशासन प्रचंड चिंतेत आहे. कोरोना विषाणूची ही साखळी तोडण्यासाठी आता कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्या अंतर्गत जिल्ह्यात तीन दिवसांची संचारबंदी लागू आहे. यापुढे देखील प्रत्येक शनिवार आणि रविवार जिल्ह्यात संचारबंदी असणार आहे. तसेच कामाच्या वेळा देखील कमी करण्यात आल्या आहेत. बाजारपेठा आता सकाळी 7 ते दुपारी 3 याच वेळेत उघड्या राहणार आहेत. तर त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ईटीव्ही भारतला दिली आहे.
परभणी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची प्रतिक्रिया... कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या सुरुवातीला दीड महिना परभणी जिल्हा हा ग्रीनझोन मध्ये होता. मात्र, त्यानंतर मे आणि जून महिन्यात परभणीतील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यातल्या त्यात गेल्या आठवडाभरापासून दररोज आढळणाऱ्या रुग्णांमुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून कडक उपाययोजना केल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी 'ईटीव्ही भारत' ला माहिती देताना सांगितले की, कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करत आहे.
हेही वाचा -शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तिजोरीत खडखडाट; मंत्र्यांच्या गाड्यांसाठी उधळपट्टी
विशेषत: परजिल्ह्यातून येणाऱ्या लोकांना विलगीकरणात राहण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. तर त्यातील संशयितांना तत्काळ दवाखान्यात पाठवत आहोत. गेल्या तीन महिन्यात अनेक वेळा संचारबंदी लावण्यात आली. त्याप्रमाणेच सध्या तीन दिवसांची संचारबंदी देखील सुरू आहे. मात्र, आता यापुढे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक आठवड्यातील शनिवार-रविवार असे दोन दिवस संचारबंदीचे राहणार आहेत. जेणेकरून कोरोनाची साखळी तोडण्यात हातभार लागेल. त्याप्रमाणेच कामाच्या वेळा देखील कमी करण्यात आल्या आहेत. यापूर्वीची वेळ सकाळी 9 ते 5 अशी होती. त्यामुळे बाजारात गर्दी करतानाच नागरिक सायंकाळी 5 नंतरही रस्त्यावर दिसत होते. मात्र, आता या वेळेत बदल करण्यात आला असून, यापुढे सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेतच बाजारपेठा आणि कामाच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच बँका देखील सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेतच सुरू राहतील.
हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष: विद्यार्थी गळती रोखण्यासाठी शिक्षकाने फुलवली शाळेच्या आवारत शेती; स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांना दिला रोजगार
शासकीय कार्यालयांच्या वेळेमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. दस्त नोंदणीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यात नोंदणी करणाऱ्या लोकांपैकी दहा ते बारा जणांनाच बोलावून त्यांचा दस्त नोंदणी केल्या जात आहे. याशिवाय परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी केल्या जातो. लाखोंच्या संख्येने असलेला कापूस उत्पादक कापूस विक्रीसाठी गर्दी करत असतो. त्यामुळे त्यांना नियंत्रित करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्यामुळे कापूस केंद्रांवरील गर्दी देखील कमी करण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी झाल्याचे जिल्हाधिकारी मुगळीकर म्हणाले.