परभणी- पुणे येथून चोरट्या मार्गाने प्रवास करून परभणी शहरात आलेल्या 21 वर्षीय कोरोनाबाधीत तरुण आणि त्याच्या बद्दलची माहिती दडवून ठेवणाऱ्या त्याच्या नातेवाईकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या शिवाय सेलू येथे एका घरात सामूहिक नमाज पठण करणे देखील 18 लोकांना महागात पडले. याशिवाय पाथरी येथे तोंडाला मास्क न लावता फिरणार्या लोकांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
परभणीतील कोरोनाबाधितासह नातेवाईकांवर गुन्हा; सामूहिक नमाजसह मास्क न बांधणे पडले महागात - परभणी कोरोना न्यूज
पुणे येथून चोरट्या मार्गाने प्रवास करून परभणी शहरात आलेल्या 21 वर्षीय कोरोनाबाधीत तरुण आणि त्याच्या बद्दलची माहिती दडवून ठेवणाऱ्या त्याच्या नातेवाईकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
कोविड -19 संसर्गाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी परभणी जिल्ह्याच्या सीमेवर 15 ठिकाणी नाकाबंदी करून सीमा सील करण्यात आल्या आहेत. तरीसुध्दा चोरीच्या मार्गाने अनेक लोक मुंबई, पुणे, औरंगाबाद येथुन परभणी जिल्ह्यात प्रवेश करत आहेत. त्याप्रमाणेच कोरोनाचा संसर्ग झालेला रूग्ण देखील पुणे येथून मोटार सायकलने प्रवास करून परभणीच्या औद्योगिक वसाहतीतील त्याचे नातेवाईकाकडे वास्तव्याच्या उद्देशाने आला होता. तर त्यास त्याच्या नातेवाईकांनी देखील आश्रय दिला. त्यामुळे त्यांच्यासह त्याच्या नातेवाईकांविरुद्ध कलम 188, 269, 270 व 51 आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे सर्वजण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर पाथरी पोलीस ठाण्यांतर्गत लॉकडाऊन काळात तोंडावर मास्क किंवा रूमाल न बांधता विनाकारण मोटार सायकलवर फिरताना तसेच एका बोलेरो गाडीमध्ये मास्क तथा रूमाल न बांधता काही लोक फिरताना सापडले आहेत. त्याच्या विरूध्द देखील आपत्ती व्यवस्थान कायदयान्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकत्र न जमता सोशल डिस्टंन्स ठेवण्याचे प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. असे असूनही सेलु शहरातील एका घरी आदेश डावलून 18 लोकांनी एकत्र येऊन प्रार्थना (नमाज) केली. म्हणुन त्यांच्या विरूध्द देखील कलम 51 ब. आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतीबंधक अधिनियम आणि कोवीड-19 उपाययोजना अधिनियम कलम 11 नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
सद्यस्थितीत कुणीही रस्त्यावर मास्क किंवा रूमाल बांधल्याशिवाय विनाकारण फिरू नये. तसेच मोठ्या शहरातून चोरून-लपून येवू नये आणि अशा प्रकारे येणाऱ्यांना नातेवाईक तथा अन्य लोकांनी आश्रय देवून माहिती लपवुन ठेवू नये. महत्त्वाचे म्हणजे प्रतिबंध करण्यात आलेल्या सामूहिक प्रार्थना कोणीही करू नयेत, असे आवाहन करताना हे गुन्हे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने देण्यात आला आहे.