परभणी- गेल्या पंधरा दिवसांपासून वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे परभणी जिल्ह्यातील संचारबंदीची अंमलबजावणी अत्यंत कडक पद्धतीने होत होती. मात्र गेल्या चार दिवसात कोरोना बाधितांचा अकडा कमी होत असून, या पार्श्वभूमीवर आचारसंहितेत देखील शिथिलता देण्याची भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. त्यानुसार शनिवारी रात्री 10.30 वाजता काढलेल्या आदेशात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेसह इतर सर्व आस्थापनांना सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.
परभणी जिल्ह्यात सद्यपरिस्थितीत 89 कोरोनाबाधित आढळले आहेत. मात्र त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून, तब्बल पन्नास लोकांना सुट्टी देण्यात आलेली आहे. ज्यामुळे केवळ 37 रुग्णांवर कोरोना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शिवाय दिलासाजनक बातमी म्हणजे गेल्या चार दिवसात नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. तसेच प्रलंबित राहिलेल्या अहवालांचे निकाल देखील निगेटिव्ह येत आहेत. त्यामुळे कुठेतरी कोरोनापासून परभणी जिल्ह्याला दिलासा मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.