परभणी -राज्यातील मराठा समाज आरक्षणावर स्थगिती आल्याने आक्रमक झाला आहे. यासाठीचे आंदोलन आता दिवसेंदिवस तीव्र होत आहे. याच मागणीसाठी जिल्ह्यातील मानवत येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आज (बुधवारी) तहसील कार्यालयासमोर कपडेफाड आंदोलन करत सरकारचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
मराठा आरक्षणासाठी मानवतमध्ये सकल मराठा समाजाकडून मुंडण करून कपडेफाड आंदोलन - मानवतमध्ये कपडे फाड आंदोलन
मानवत येथील सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर हे कपडेफाड आंदोलन करण्यात आले. यापूर्वी कार्यकर्त्यांनी मुंडण आंदोलन केले होते.
मानवत येथील सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर हे कपडेफाड आंदोलन करण्यात आले. यापूर्वी मानवत नगर पालिकेसमोर सकल मराठा समाजाच्या वतीने मुंडण आंदोलन केले होते. त्यानंतर नगरपालिकेपासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पायी रॅली काढून राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 19 सप्टेंबरपासून सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनातून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करीत जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यत आंदोलन चालूच राहतील, असाही इशारा यावेळी समाजबांधवांनी दिला आहे. तसेच प्रशासनास दिलेल्या निवेदनात मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याबाबत राज्य सरकारने सर्वतोपरी न्यायालयीन लढाईसाठी योग्य ते प्रयत्न करावेत. केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून आरक्षण मर्यादा वाढवावी व लोकसभेत सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरिता ठराव पास करावा, सरसकट मराठा समाजास ओबीसी संवर्गामध्ये समावेश करावा, मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत राज्य सरकारने सर्व प्रकारची नोकरभरती बंद ठेवावी, आदी विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. तसेच मानवत येथील सकल मराठा समाजाच्या वतीने हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला.