परभणी- जगभरात कोरोना आजाराने थैमान घातले आहे. याचा सर्वाधिक फटका मांस विक्री करणाऱ्या व्यवसायांवर झाल्याचे दिसून आले आहे. त्यातच भारतात चिकन व्यवसाय अक्षरशः बंद पडण्याच्या मार्गावर आहे. १० रुपये किलो दराने कोंबडी विकली जात आहे. यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांना आपला खर्च भागवणे देखील कठीण झाले आहे. त्यामुळे, शासनाकडून अनुदान स्वरूपात मदत मिळावी, अशी मागणी पोल्ट्री व्यवसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये मृतांची संख्या वाढत असतानाच राज्यातही कोरोनाबाबतच्या अफवांमुळे पोल्ट्री व्यवसाय बुडण्याच्या मार्गावर आहे. चिकन खाल्ल्याने कोरोना विषाणूची लागण होत असल्याची अफवा उठल्याने पोल्ट्री व्यवसायिकांचा बाजार उठला आहे. त्यामुळे, चिकनचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. प्रति किलो कोंबडीचा दर आता अवघ्या १० ते १५ रुपयांवर आला आहे. नागरिक चिकन खात नसल्याने १८० रुपये किलो विकले जाणारे चिकन आता बाजारात सध्या चक्क ४० ते ५० रुपये किलोने विकले जात आहे. त्यामुळे, पोल्ट्री व्यवसायिक आणि चिकन विक्रेते धास्तावले आहेत.