परभणी- 10 वीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी चालविण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागाने नियुक्त केलेले पर्यवेक्षक बदलून त्यांच्या जागी मर्जीतील शिक्षकांची तोंडी नियुक्ती करण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात प्रमुख असलेल्या केंद्र संचालकाचा शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी पर्दाफाश केला. त्या संचालकासह ११ शिक्षकांवर त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे ३ दिवसांत दुसरी कारवाई करून बोगस शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई झाली आहे. दरम्यान, आज विज्ञान १ च्या पेपर दरम्यान ४ कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांवरदेखील कारवाई झाली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज यांनी बुधवारी पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे अचानक भेट देऊन तेथील सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आणत ११ शिक्षकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यानंतर पुन्हा शुक्रवारी परभणी तालुक्यातील संबर येथील गुरू आनंद विद्यालयाच्या केंद्रावर अचानक भेट दिली. तेव्हा या ठिकाणी तर एरंडेश्वरपेक्षाही भयानक प्रकार दिसून आला. या ठिकाणच्या केंद्र संचालकाने तर शिक्षण विभागाने नियुक्त केलेल्या पर्यवेक्षकांनाच घरी बसवले आणि त्यांच्या जागी स्वतःच्या मर्जीतील ११ शिक्षकांच्या तोंडी नियुक्त्या केल्या. यात एका कारकुणाचा तर एका खासगी इंग्रजी शाळेतल्या शिक्षिकेचादेखील समावेश आहे.