परभणी - 'कोरोना'च्या धास्तीने सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू असली तरी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सरकारने नागरिकांना मुभा दिली आहे. मात्र, ही खरेदी करत असताना भाजीपाला असो, दूध असो किंवा किराणा असो या सर्वच ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर परभणी शहरात दूध विक्रेते उभे राहत असलेल्या दुधमंडईंच्या ठिकाणांवर मनपाकडून एक मीटर वर आखणी करून सोशल-डिस्टन्सिंग चा प्रयोग करण्यात आला आहे.
दुधासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी सोशल-डिस्टन्सिंग; मनपाने केली 1 मीटरवर आखणी - कोरोना विषाणू बद्दल बाती
कोरोना रोगाच्या भीतीमुळे सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली असून जीवनावश्यक वस्तूची दुकाने खुली आहेत. परभणीत दुधखरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी मनपाने एक मीटरची आखणी करुन दिली आहे.
परभणी सकाळच्यावेळी गांधी पार्क, अष्टभुजा देवी चौक, गुजरी बाजार, काळीकमान, जिंतूर रोड, गंगाखेड रोड आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या खेड्यातून येणारे शेतकरी दूध विक्रीसाठी उभे राहतात. मात्र, याठिकाणी दूधवाल्यांची व दुधाची खरेदी करायला येणाऱ्या ग्राहकांची प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. एकाच जागेवर उभे राहत असल्याने सहाजिकच नागरिक देखील कुठलीही खबरदारी न घेता गर्दी करताना दिसून येत होते. हा प्रकार टाळण्यासाठी महापालिकेने गांधी पार्कातील गुजरी बाजारपासून ते अष्टभुजा देवी चौकापर्यंत रस्त्यावर साधारण एक मीटरवर दूध विक्रेत्यांना उभे राहण्यासाठी आखणी करून दिली आहे. यामुळे ग्राहक देखील थोड्या अंतराने उभे राहून दुधाची खरेदी करु शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षक यांच्यासह कर्मचाऱ्यांनी कालच आखणी करुन आज (शनिवारी) या आखलेल्या चौकटीत सर्व दूधवाल्यांना उभे करून दुधाची विक्री करण्याची सवय लावली आहे.