परभणी - येथील रेल्वेस्टेशन पुढील एका कुटुंबातील सदस्याला कोरोना लागण झाल्याने त्या घरातील सर्व सदस्य क्वारंटाइन करण्यात आले आहेत. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी मध्यरात्री त्यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात शिरकाव केेला; मात्र, त्या चोरट्यांनी कुठला ऐवज चोरून नेला नाही, ते रिकाम्या हाताने परतले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. गुरुवारी सकाळी पोलिसांनी पंचनामा केला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
सध्या परभणीत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याची लागण रेल्वे स्थानकापुढे राहणाऱ्या एका कुटुंबातील सदस्याला झाली आहे. त्यामुळे या घरातील इतर सदस्यांना देखील क्वारंटाइन कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या घरात कोणीही राहत नाही. परिणामी घराला कुलूप लावून हे कुटुंब गेल्याने या संधीचा फायदा घेण्यासाठी काही चोरट्यांनी प्रयत्न केला; मात्र, मध्यरात्री आलेले हे चोरटे चोरी न करताच परतले आहेत.
आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास शेजाऱ्यांना सदर घराचा दरवाजा तुटलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यामुळे त्यांनी तत्काळ कुटुंबातील सदस्यांना याची माहिती दिली. त्यानुसार त्यांनी पोलिसांना कळवले. पहाटे सहा वाजता घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी घराची पाहणी केली. घरात जाण्यापूर्वी पोलिसांनी पीपीई किट घालून या घरात प्रवेश केला. तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनादेखील बोलावण्यात आले होते. शिवाय क्वारंटाइन केलेल्या कुटुंबातील महिलांनादेखील रुग्णवाहिकेतून घरी आणण्यात आले होते. या ठिकाणी सदर महिलांनी संपूर्ण घरात फिरून पाहणी केली. त्यानंतर घरातली कुठलीही वस्तू चोरी झाली नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. मग दरवाजा कसा तुटला? असा प्रश्न निर्माण झाला आहे. चोरटे चोरीच्या उद्देशाने आले तर चोरी न करताच कसे परतले, हाही सवाल उपस्थित होत आहे.
पोलिसांनी याप्रकरणी तक्रारदाराने दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे घटनास्थळावरून चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाची मदत घेता आली नाही. कारण सदर घरात कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आल्याने त्याचा संसर्ग कुत्र्यांना होऊ शकतो. त्यामुळे घटनास्थळी आलेल्या श्वानपथकाला आल्या पावली परत पाठविण्यात आले. या घटनेचा तपास लावण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जाणार आहेत. दरम्यान, घरातील कुठलाही ऐवज गेला नसला तरी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांनी दिली आहे.
कदाचित कोरोनाच्या भीतीने चोरटे पळाले..!
दरम्यान, घरात कोणीही नसल्याची माहिती लागल्याने चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला; मात्र, त्यानंतर त्यांना या घरात कोरोनाबाधित रुग्ण असल्याची माहिती मिळाली असावी. त्यामुळे भीतीने आल्या पावली चोरटे पळाले असावेत, अशी चर्चा शेजारी करताना दिसत होते.