परभणी - लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे अनेकांचे जुळलेले विवाह रद्द झाले, तर काहींनी अगदी साधेपणाने विवाह उरकून घेत संसार सुरू केला आहे. आता यापुढे देखील हीच पद्धत अवलंबावी लागणार आहे. जिंतूर येथे एका मुलीला पाहण्यासाठी आलेल्या वराने जागेवरच पसंती देऊन मुलीसह विवाह करण्याची इच्छा दर्शवली. त्यावर दोन्ही परिवारांनी संमती देऊन लागलीच हा विवाह उरकून देखील घेतला. या 'लॉकडाऊन विवाहा'ची सर्वत्र चर्चा होत आहे.
'मुलगी पहायला आले आणि लग्न लावून गेले' असा योग जिंतूरात घडून आला आहे. जिंतूर शहरातील व्यापारी राजकुमार जगन्नाथ चिद्रवार यांची मुलगी दीक्षा हिला बोधडी (जि. नांदेड) येथील व्यापारी श्रीराम लक्ष्मणराव उत्तरवार आपल्या मुलासह काल बुधवारी पाहायला आले होते. वधू-वरांनी दोघांनीही एकमेकांना पसंती दिली. त्यामुळे दोन्ही परिवाराने संमती देऊन लागलीच श्रीराम उत्तरवार यांचे चिरंजीव सतीश उत्तरवार यांच्याबरोबर दीक्षाचा विवाह लावून दिला. हा सोहळा जिंतूर येथील छत्रपती शिवाजी चौक येथील त्यांच्या राहत्या घरी काल बुधवारी सायंकाळी संपन्न झाला.