परभणी- यंदा निसर्गाच्या कृपेने मृगाचा पाऊस वेळेवर बरसला. त्यानंतर पेरणीयोग्य पाऊस झाल्याने बळीराजा आनंदीत होता. मात्र, निसर्गानं तारलं असलं तरी काही शेतकऱ्यांना बोगस बियाणे कंपन्यांनी गंडावलं आहे. या संदर्भात आतापर्यंत जिल्ह्यातील 3 हजार 661 शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवली आहे. 'वेळेत पेरणी केल्यानंतर 15 दिवस वाट पाहून अखेर डोळ्यात पाणी आलं, पण बियाणं काही उगवलं नाही', अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली आहे. आता याकडे शासनानेच गांभीर्याने पाहून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
परभणीतील सोयाबीन उत्पादक चिंतेत...प्रतिनिधी गिरीराज भगत यांनी घेतलेला आढावा हेही वाचा -संत मुक्ताईंच्या पालखीचे पंढरपूरला प्रस्थान; हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमली अवघी मुक्ताईनगरी
परभणी जिल्ह्यात सुमारे 3 हजार 661 शेतकऱ्यांना बियाणे उत्पादक कंपन्यांनी तसेच महामंडळाने देखील निकृष्ट दर्जाचे बियाणे दिल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे नोंदविण्यात आल्या आहेत. अजूनही हजारो शेतकरी सोयाबीनचे बियाणे उगवण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये सर्वाधिक 1 हजार 410 तक्रारी ईगल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड इंदोर या कंपनीच्या आहेत, तर 515 तक्रारी ग्रीन गोल्ड कंपनीच्या असून, 443 शेतकऱ्यांनी महाबीजच्या बियाण्या विरोधात तक्रारी नोंदवल्या आहेत. याशिवाय पारस कंपनीच्या देखील 147 तक्रारी आहेत. विशेष म्हणजे या तक्रारी परभणी जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमधून शेतकरी करत आहेत.
जिल्ह्यात 1 लाख 55 हजार 265 हेक्टर जमिनीवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी अनेक कंपन्यांचे सोयाबीन बियाणे विकत घेतले. परंतु वरील कंपन्यांच्या बियाण्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याने ते बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच्या तक्रारी सध्या कृषी अधिकाऱ्यांकडे करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने कृषी अधिकारी तसेच संबंधित कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करत आहेत. शासकीय प्रक्रिया सुरू झाली असली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्याला मात्र मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
हेही वाचा -१९६२च्या भूतकाळात का जगताय? शिवसेनेचा केंद्र सरकारला सवाल
बँकांचे कर्ज न मिळाल्याने सावकारी कर्ज घेऊन अनेक शेतकऱ्यांनी बियाण्यांची खरेदी केली. पाऊस चांगला झाल्याने पेरणी केली. आता हे बियाणे उगवलेच नाही तर पुढे काय करणार? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. महाबीजकडून निकृष्ट बियाण्यांच्या बदल्यात दुसरे बियाणे मिळत आहे, मात्र दुसरे बियाणे देखील उगवले नाही तर काय करायचे? असाही प्रश्न परभणी तालुक्यातील नांदापूरच्या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी नांदापूर येथील शेत शिवरामध्ये प्रत्यक्ष भेट दिली असता, या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे. ज्यामध्ये पंडितराव लांडगे यांनी तर 'वाट पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण बियाणं काही उगवलं नाही', अशी व्यथा मांडली. आता यापुढे करायचे काय? सावकाराचं देणं कसं भेडायचं? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तर गावातीलच भगवानराव रसाळ यांनी महाबीज बियाणे पेरले होते, त्यांच्या केवळ एक चतुर्थांश बियाण्याची उगवण झाल्याचे त्यांनी सांगितले. तर शेतकरी मदन लांडगे यांनी देखील तीव्र संताप व्यक्त करत बियाणे कंपन्यांवर सरकारने काही निर्बंध ठेवायला हवेत, अशी मागणी केली.
पंचनामे झाले, मात्र पुढे काय? मुळात कंपन्या बोगस बियाणे देतातच कसं. व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडियावर घरचे बियाणे पेरू नका, कंपन्यांचं बियाणं घ्या, असे मेसेज फिरत होते. म्हणून आम्ही घरचे बियाणे पेरले नाही, कंपन्यांवर विश्वास ठेवून त्यांचे बियाणे विकत घेऊन ते पेरलं, मात्र झाले उलटेच. कमी पडले म्हणून घरचे थोडाफार पेरलेलं बियाणे चांगले उगवले, मात्र या ब्रँडेड बियाणे कंपन्यांचे बियाणे उगवलेच नाही, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.
या संदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाबाई विटेकर, उपाध्यक्ष अजय चौधरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, कृषी अधिकारी सागर खटकाळे, कृषी विकास अधिकारी हनुमान मुंडे आणि सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची सोमवारी बैठक पार पडली. ज्यामध्ये या कंपन्यांच्या प्रतिनिधींना शेतकऱ्यांचे झालेले संपूर्ण नुकसान येणाऱ्या सात दिवसात द्यावे, अन्यथा कारवाई करू, असा इशारा देण्यात आला आहे. तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाल्यास ते काहीतरी पेरणी करू शकतील, अन्यथा भरपाई मिळण्यासाठी विलंब झाल्यास या वर्षीचा खरीप शेतकऱ्यांच्या हातून जाणार, हे मात्र निश्चित.