परभणी- जिल्ह्यात ऐन खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांना वेठीस धरून युरिया खतांचा काळाबाजार सुरू आहे. यामुळे शेतकरी बेजार झाले आहेत. युरियाचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करा अन्यथा त्या व्यापाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.
जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचे सोयाबीन न उगवल्याचे प्रकरण ताजे असतानाच शेतीसाठी आवश्यक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून त्याचा काळा बाजार केला जात असल्याचे समोर आले आहे. हा धक्कादायक प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आला. सोनपेठ तालुक्यातील एक कृषी सेवा केंद्रचालक आपल्या गोदामातून शेतकऱ्यांकडून जास्तीचे पैसै घेऊन युरिया खत देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर शेतकऱ्यामधून संताप व्यक्त होत आहे.
दुसरीकडे चार दिवसापूर्वी आलेला संपूर्ण युरिया शेतकऱ्यांना वाटल्याचा दावा, कृषी सेवा केंद्र चालकांनी केला होता. संपूर्ण युरिया चार दिवसापूर्वी वाटलेला असताना दुकानदारांच्या गोदामात हा युरिया आला कुठून? असा सवाल शेतकरी संघटनेचे माजी मराठवाडा विभाग प्रमुख सुधीर बिंदू यांनी उपस्थित केला आहे.