परभणी - पक्षात प्रामाणिकपणे काम करून सुद्धा भाजपने माझी उमेदवारी डावलली. केवळ कुरघोडीच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे यांचा मावळा या नात्याने मला बाजूला टाकण्याचं काम भाजपने केल्याचा गंभीर आरोप भाजपचे बंडखोर तथा मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांनी केला आहे. तसेच विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी गेली बारा वर्षे आपली आमदारकी केवळ गुत्तेदारी आणि चेले-चपाटे पोसण्यासाठी उपभोगल्याचा आरोप सुद्धा पोकळे यांनी केला आहे.
शहरातील एका हॉटेलमध्ये आज (शनिवारी) सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार रमेश पोकळे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत संभाजी सेनेचे परमेश्वर शिंदे, विठ्ठल तळेकर व अन्य काही पदाधिकारी उपस्थित होते.
विद्यमान आमदारांनी 12 वर्षात केलेली केवळ 12 कामे दाखवावीत -यावेळी बोलताना रमेश पोकळे यांनी, गेल्या बारा वर्षापासून परभणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर आमदार सतीश चव्हाण निवडून येत आहेत. मात्र, या बारा वर्षात त्यांनी पदवीधरांसाठी केलेली 12 कामे दाखवून द्यावीत, असे आव्हान दिले. चव्हाण यांना केवळ आपले चेलेचपाटे व गुत्तेदारी पोसण्यासाठी आमदारकी हवी आहे. त्यांना मतदार संघातील विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांची कुठली जाण नाही. केवळ मिरवण्यासाठी हे आमदार होत असल्याचे देखील पोकळे म्हणाले. तसेच भाजपने उमेदवारी नाकारलेल्या बद्दल त्यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली. मी गेल्या 22 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. माझ्यासारख्या शिक्षण क्षेत्रातील समस्यांची जाण असणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्याऐवजी शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांची जाणीव नसलेल्या व्यक्तीला उमेदवारी देऊन भाजपने काय साध्य केले ? हे कळायला मार्ग नाही, असे देखील पोकळे यांनी यावेळी सांगितले.
सर्जिकल स्ट्राईक झालेला दिसेल -यावेळी कुठल्याही परिस्थितीत राजकीय पक्षाचा आमदार निवडून द्यायचा नाही, असा निर्धार पदवीधर मतदारांनी केला आहे. माझ्या आजूबाजूला मोठे राजकीय पुढारी दिसत नसले तरी निकाल लागल्यानंतर एक सर्जिकल स्ट्राईक झालेला तुम्हाला दिसेल. त्यामुळे चळवळीमधील कार्यकर्ता तुम्हाला पाहिजे, का सहा वर्षांनी तोंड दाखवणार पाहिजे ? असा सवाल देखील रमेश पोकळे यांनी यावेळी उपस्थित केला.
भाजपच्या उमेदवाराशी माझी लढत नाही, तो मागे पडला -भाजपच्या उमेदवारावर मी टीकाटिप्पणी करणार नाही. कारण तो माझ्या लढतीतच नाही. तो या लढतीतून केव्हाच मागे पडला आहे. माझी लढत ही पदवीधरांच्या स्वाभिमानाची लढत आहे. पदवीधरांच्या अस्तित्वाची लढाई आहे, अशी भावना देखील रमेश पोकळे यांनी व्यक्त केली.