महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा नियोजनबद्ध शिरकाव

परभणी जिल्हा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. याठिकाणी तीस वर्ष अधिक काळापासून शिवसेनेचा खासदार निवडून येतो. शिवाय १९८९ पासून भगवा कायम आहे.

सेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा नियोजनबद्ध शिरकाव

By

Published : Oct 13, 2019, 12:08 PM IST

परभणी -गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणी जिल्ह्यात फारशी ताकद नसलेल्या भाजपने यंदा अत्यंत नियोजनबद्ध ५० टक्के वाटा मिळवला आहे. मित्र पक्षांसाठी सोडवून घेतलेल्या दोन्ही जागांवर भाजपने कमळाच्या चिन्हावर आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यात चार पैकी दोन विधानसभांमध्ये आता भाजपचा उमेदवार निवडणूक लढवत आहे.

हेही वाचा - हा महाराष्ट्र मला तरुणांच्या हाती द्यायचाय - शरद पवार

परभणी जिल्हा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. याठिकाणी तीस वर्ष अधिक काळापासून शिवसेनेचा खासदार निवडून येतो. शिवाय १९८९ पासून आजपर्यंत परभणी विधानसभा मतदारसंघावरचा भगवा देखील बाजूला झालेला नाही. याप्रमाणेच पाथरी विधानसभा मतदारसंघात देखील दोन वेळा शिवसेनेने विजय संपादन केला आहे. तसेच २०१४ विधानसभा निवडणुकीत पाथरी विधानसभेत निवडून आलेले अपक्ष उमेदवार मोहन फड हे देखील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार होते. त्यानंतर ते पुन्हा स्वगृही परतले होते. मात्र, सध्या ते भाजपमध्ये दाखल झाले असून, त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, आणि पाथरी हे तीनही मतदारसंघ युतीच्या वाटाघाटीत शिवसेनेच्या वाट्याला असतात. मात्र, यावेळी शिवसेनेने परभणी, गंगाखेड या दोनच विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत. ऐनवेळी गंगाखेडची जागा शिवसेनेला देण्यात आली. त्या बदल्यात भाजपने पाथरीची जागा घेतली. परंतु, सुरुवातीला पाथरी मतदारसंघात मित्रपक्ष असलेल्या 'रिपाइ'ला ही जागा देणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार 'रिपाइ'च्या कोट्यातून ही उमेदवारी दिली. परंतु, प्रत्यक्षात मात्र पाथरीचे उमेदवार मोहन फड हे कमळाच्या चिन्हावर आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवत आहेत.

जिंतूर हा शिवसेनेच्या वाट्यातील मतदारसंघात भाजपने मेघना बोर्डीकर यांना उमेदवारी दिली. सुरुवातीला या ठिकाणची जागासुद्धा मित्रपक्ष असलेल्या 'रासप'ला देण्यात आल्याचे जाहीर केले होते. परंतु, प्रत्यक्षात मात्र या ठिकाणीसुद्धा कमळाचे चिन्ह देऊन भारतीय जनता पक्षाची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या रासपने गंगाखेड मतदारसंघात शिवसेनेच्या विरोधात रत्नाकर गुट्टे यांना उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

दरम्यान, या एकूण वाटाघाटीत प्रत्यक्ष शिवसेनेचेच नुकसान झाले आहे. सेनेच्या तीनपैकी एक जागा भाजपने ताब्यात घेतली, तर गंगाखेडच्या जागेवर महायुतीलाच रासपने आव्हान उभे केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेनेला किती जागा मिळवता येतील, हा प्रश्नच आहे. एकूणच या वाटाघाटीत भाजपने मात्र आपला फायदा करून घेतला आहे. ज्या जिल्ह्यात कुठलीच ताकद नव्हती, त्या ठिकाणी थेट ५० टक्के शक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. येणाऱ्या काळात सेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणीत भाजप की शिवसेना २४ ओक्टोबरलाच समजेल.

हेेही वाचा - 'पेशवाईच्या हातात राज्य गेल्यास 'वर्ण' व्यवस्था यायला वेळ लागणार नाही'

ABOUT THE AUTHOR

...view details