परभणी - भाजपच्या ताब्यात असलेल्या परभणी जिल्ह्यातील सेलू आणि पालम नगरपालिकेने सीएए आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात ठराव घेत तो पारित केला. देशभरात या कायद्यावरुन वातावरण तापलेले असताना भाजपच्याच ताब्यात असलेल्या नगरपरिषदेने अशा प्रकारचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. त्यातच आता या प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दानवे यांनी तत्काळ कारवाई करत सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे आणि पालमचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब रोकडे यांना निष्कासीत केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा... भाजपच्या ताब्यातील नगरपालिकांनीच संमत केला 'सीएए'-'एनआरसी' विरोधात ठराव
सेलू नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा 28 फेब्रुवारीला पार पडली होती. ज्यात विधानसभेपूर्वी 18 नगरसेवकांसह भाजपमध्ये दाखल झालेले नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी पालिकेच्या सभागृहात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) याला विरोध असल्याचा विषय मांडला होता. सर्व सदस्यांनी यावर चर्चा केली. नगरसेवक अब्दुल वहिद हमीद यांनी अनुमोदन दिले. तर सभागृहातील 28 पैकी 26 नगरसेवकांनी या ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या.
शिवसेनेचे नगरसेवक मनीष कदम आणि आशा दिशागत यांनी मात्र पक्षाची भूमिका पक्षश्रेष्ठींना विचारुन आपली भूमिका मांडणार असल्याचे सांगून स्वाक्षऱ्या केल्या नाहीत. विशेष म्हणजे हा ठराव घेतल्याची माहिती गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याच प्रमाणे पालम नगरपंचायतीही भाजपचे वर्चस्व असून येथील उपनगराध्यक्ष बाळासाहेब गणेश रोकडे यांनी देखील हा ठराव घेऊन तो संमत केला. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी काल 3 मार्च रोजी कारवाई करत या दोन्ही लोकप्रतिनिधींना निष्कासित केल्याचे आदेश आदेश बजावले आहेत.