परभणी -भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आज रविवारी पीकविम्याच्या मागणीसाठी परभणी दौऱ्यावर आलेल्या कृषिमंत्री दादाजी भुसे यांना काळे झेंडे दाखवून घेराव घातला. तसेच त्यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजीही केली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
आश्वासनाची पूर्तता न झाल्याने आंदोलन -
महाराष्ट्र शासनाने 5 मे रोजी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई बाबत नवीन अध्यादेश काढून तत्काळ लाभ देण्याची घोषणा केली होती. या संदर्भात स्वतः कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सभागृहात आश्वासनदेखील दिले होते. मात्र, या आश्वासनाची अद्यापही पूर्तता न झाल्याने त्यांच्यापुढे हे आंदोलन करत असल्याचे आमदार मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.
हेक्टरी 15 हजाराची मदत पेरणीपूर्वी द्या -
यावेळी तत्काळ शेतकऱ्यांना पीकविम्याची द्यावी, तसेच लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने त्यांना हेक्टरी 15 हजाराची मदत पेरणीपूर्वी द्यावी, ही मागणी देखील करण्यात आली. यावेळी पीकविम्यासह अन्य काही मागण्यांसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, पदाधिकारी सुरेश घुमरे, बाळासाहेब जाधव आदींसह पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी नवा मोंढा पोलीसांनी या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.
हेही वाचा - काँग्रेसच्या कार्यक्रमात पोलिसांचे काय काम? आमदार भाई जगताप पोलिसांवर संतापले