परभणी - भाकर मिळाली नाही तरी चालेल पण एखाद्याला शिक्षा झालीच पाहिजे, असा विचार करण्याची चूक तरुणांनी करू नये. सैन्य कधीच रिकाम्या पोटाने लढत नसते. दुर्दैवाने, भाजप सरकारने तरुणांच्या याच भावनांचा खेळ मांडला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (22 ऑगस्ट) परभणीत केली. डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त परभणीतील शिवाजी महाविद्यालयात सायंकाळी पार पडलेल्या 'युवक संवाद' कार्यक्रमाला हजेरी लावून युवकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
भाजप सरकारने तुमच्या भावनांचा खेळ मांडलाय; डॉ.अमोल कोल्हे यांनी परभणीत साधला युवकांशी संवाद - yuva sanvad NCP Parbhani
भाकर मिळाली नाही तरी चालेल पण एखाद्याला शिक्षा झालीच पाहिजे, असा विचार करण्याची चूक तरुणांनी करू नये. सैन्य कधीच रिकाम्या पोटाने लढत नसते. दुर्दैवाने, भाजप सरकारने तरुणांच्या याच भावनांचा खेळ मांडला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज(22 ऑगस्ट) परभणीत केली.
शैक्षणिक प्रश्नांवर उत्तर देताना कोल्हे यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठा गोंधळ असल्याचा आरोप केला. विना अनुदानित संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण नाकारल्या जाते. तर उच्च माध्यमिक शिक्षकांना वेतन नाही. हे सरकार 24 हजार शिक्षकांच्या जागा रिक्त असताना पवित्र पोर्टलवर फक्त पाच हजार जागा भरत आहे. शिक्षण क्षेत्राचा अक्षरशः खेळखंडोबा झाला आहे. तो दूर करायचा असेल तर सरकार बदला, असेही कोल्हे म्हणाले.
यावेळी शिवाजी महाविद्यालयासह शहरातील इतर महाविद्यालयातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला माजी महापौर प्रताप देशमुख, जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार, विधानसभा प्रमुख शंकर भागवत, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे गंगाधर जवंजाळ, सुमित परिहार यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांनीही हजेरी लावली होती.