परभणी - जिल्ह्यातील बर्ड फ्लूचे संकट अधिक वाढले आहे. परभणी तालुक्यातील मुरुंबा येथे बर्ड फ्लूची लागण झालेल्या कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता पेडगाव व सेलू तालुक्यातील कुपटा येथील कोंबडयाही 'बर्डफ्लू' मुळे दगावल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला मिळाला.
पेडगाव व सेलू तालुक्यातील कुपटा या गावांच्या एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या दोनही गावचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला.
साडेपाच हजाराहून अधिक कोंबड्या नष्ट
राज्यात सर्वात आधी बर्डफ्लूने बाधित झालेल्या कोंबड्या परभणी तालुक्यातील मुरुंबा या ठिकाणी आढळून आल्या होत्या. 800 ते 900 कोंबड्या यामुळे दगावल्या आहेत. त्यांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या ठिकाणच्या कोंबड्या नष्ट करण्याची प्रक्रिया पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आली आहे. यामध्ये साडेपाच हजाराहून अधिक कोंबड्यांना नष्ट करण्यात आले. त्याच दरम्यान कुपटा येथे देखील 426 कोंबड्या मरण पावल्याने त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
हेही वाचा-बर्ड फ्लू'च्या धास्तीने पोल्ट्री व्यवसायावर संकट; शासनाने खात्री करून कारवाई करण्याची मागणी
- कुपटा येथील 426 कोंबड्यांचा मृत्यू
दरम्यान, कुपटा येथील 426 कोंबड्या अज्ञात रोगाने गेल्या चार दिवसांपूर्वीच दगावल्याची घटना घडली होती. त्याच वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपायोजना म्हणून हे गाव प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले. मात्र, या कोंबड्यांचा अहवाल येण्यासाठी विलंब होत असल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची धाकदुक वाढली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा यासंदर्भातील अहवाल आला आहे. त्यात कुपटा येथील दगावलेल्या सर्व कोंबड्या बर्डफ्लूने प्रभावित असल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय परभणी तालुक्यातील पेडगाव येथेसुद्धा काही कोंबड्या आणि इतर प्राणी पक्षी मरण पावले होते. त्याचा अहवाल देखील पॉझिटिव्ह असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली.
हेही वाचा-'बर्ड फ्लू'ला घाबरु नका, चिकन शिजवून खा - पालकमंत्री
'पशुसंवर्धन विभागाकडून उपयोजना -
गेल्या आठवड्यातच कुपटा येथील 426 काेंंबड्याचा अज्ञात रोगाने मृत्यू झाला. पशुसंवर्धन विभाग व तालुका प्रशासनाने तात्काळ त्या गावात घटनास्थळी धाव घेत उपाययोजनाकरिता पक्षांचे नमुने तपासणीकरिता पुणे येथील प्रयोगशाळेस पाठविले. तेथून ते नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेकडे पाठविले होते. तेथून शुक्रवारी रात्री त्या संबंधीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. कुपट्यातील त्या कोंबड्याचा मृत्यू 'बर्डफ्लू'मुळे झाल्याचे त्या अहवालात स्पष्टपणे नमुद केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. कुपट्या पाठोपाठ पेडगाव येथील मृत पक्षाचा नमुना भोपाळच्या प्रयोगशाळेस पाठविला होता. त्याही नमुन्याचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. या दोन्ही गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत.
- जिल्हाधिकाऱ्यांनी दिले नष्ट करण्याचे आदेश -
सेलू तालुक्यातील कुपटा या परिसरातील एक किलोमीटर भागात असलेल्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. या कोंबड्यांचे कलिंग करण्यात येणार आहे. त्यांना शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करून त्यानंतर जमिनीत खड्डे करून कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया उद्या शनिवारपासून गावात होणार आहे. यासाठी पशुसंवर्धन विभागासह आरोग्य विभाग, महसूल, स्वच्छता आदीसह इतर काही विभागाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पथक गावात दाखल होणार आहे. तसेच 'बर्डफ्लू' च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी देखील करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
बर्ड फ्ल्यू म्हणजे काय?
बर्ड फ्ल्यू हा एक संसर्गजन्य आजार आहे. हा विषाणू असून या आजाराची सुरुवात 1997 मध्ये हाँगकाँग येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये झाली होती. तेव्हापासून हा आजार जगाची पाठ काही सोडताना दिसत नाही. एव्हीयन इन्फ्ल्युएन्झा व्हायरस (H5N1) या विषाणूमुळे हा आजार पक्षांमध्ये होतो. तर, या आजाराने संक्रमित झालेल्या पक्षांच्या संपर्कात आल्यास मानवाला याचा संसर्ग होतो. याकडे दुर्लक्ष केल्यास, वेळेत उपचार न मिळाल्यास मृत्यू ओढावू शकतो.