परभणी -बहुजन क्रांती मोर्चाने नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि ईव्हीएम मशीनच्या विरोधात पुकारलेल्या 'भारत बंद'ला आज परभणीत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. सकाळपासून व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत. तर, शाळा, महाविद्यालयांना देखील सुट्टी देण्यात आली आहे.
'भारत बंद'ला परभणीत चांगला प्रतिसाद बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्याविरोधात भारत बंदची हाक दिली आहे. या बंदमुळे परभणीत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. तसेच नेहमी गजबजलेल्या बाजारपेठेतील गांधी पार्क, सुभाष रोड, क्रांती चौक, शिवाजी चौक, जनता मार्केट आणि स्टेशन रोड आदी परिसरात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत.
हेही वाचा - गस्तीवरील पोलीस व्हॅनची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भिंतीला धडक
या बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने काल पासूनच प्रत्येक चौकात बंदोबस्त तैनात केला. विशेष म्हणजे अनेक व्यापारी संघटनांकडून बंद पाळू नये, असे आवाहन करण्यात आले असले तरी, प्रत्यक्षात व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच आपली दुकाने बंदला ठेवली आहेत. दरम्यान, या बंदमधून औषधी दुकाने, रुग्णालय यांना वगळण्यात आले आहे. मात्र, या बंदमध्ये व्यापारी, शाळा आणि महाविद्यालये सहभागी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे बंदच्या पार्श्वभूमीवर जवळपासच्या खेडेगावातून कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचा लोंढा कमी झाल्याने शासकीय कार्यालये आणि बाजारात शुकशुकाट दिसून येत आहे. दुपारपर्यंत कुठल्याही संघटनेने मोर्चा किंवा रॅली काढली नव्हती. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयापुढे या कायद्याच्या विरोधात धरणे आंदोलन सुरूच आहेत. या ठिकाणी दुपारपासूनच आंदोलकांची गर्दी वाढताना दिसून येत होती.
हेही वाचा - "मोदी सरकारचा 'एनआरसी आणि सीएए'च्या माध्यमातून हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगे घडवण्याचा कट"