परभणी- जिल्ह्यातील बेलोरा येथे करपरा नदीच्या पात्रात कंबरेएवढ्या पाण्यातून चिमुकल्यांसह गावकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. स्वातंत्र्यापासून या नदीच्या पात्रावर पूल उभारावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र, अद्यापही या परिसरातील लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी त्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे वर्षानुवर्ष हा जीवघेणा प्रवास असाच सुरू आहे.
करपरा नदीतून जीवघेणा प्रवास परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात बेलोरा हे छोटेसे गाव आहे. गावाची लोकसंख्या सातशेच्या आसपास असून, या गावास ये-जा करण्याकरिता रस्ता आहे. परंतु अर्ध्याअधिक रस्त्याची दूरवस्था आहे. त्या पलीकडे म्हणजे या रस्त्यामधूनच करपरा नदी वाहते. मात्र नदी ओलांडण्याासाठी कोणताही साकव अथवा भक्कम असा पूल बांधण्यात आला नाही, तर नदीचे पाणी कापतच प्रवाहातून वाट काढावी लागते. बेलोरावासीयांसाठी ही जीवघेणी कसरत आहे.
करपरा नदीतून जीवघेणा प्रवास स्वातंत्र्यापासून आजपर्यंत या पुलाच्या मागणीकरिता बेलोरावासियांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. प्रत्येक निवडणुकीत संबंधित उमेदवारांना आपल्या व्यथा सांगितल्या. विशेषतः उन्हाळ्याचा अपवाद वगळता उर्वरीत आठ महिने ही नदी वाहते. विशेषतः पावसाळ्यात या नदीला पूर येतो, गुडघाभर तर कधी कंबरेएवढ्या उंचीवरून ही नदी वाहत असते. याच पाण्यातून ये-जा करत ग्रामस्थांना तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. नदी पत्रातून जीवघेणी कसरत करत रस्ता ओलांडावा लागतो.
करपरा नदीतून जीवघेणा प्रवास 'जेसीबीने होते सामान, जनावरे आणि विद्यार्थ्यांची वाहतूक'विशेष म्हणजे नदीला पूर आल्यानंतर किंवा एरवीदेखील शाळकरी विद्यार्थ्यांना या पात्रातून चालत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना जेसीबीच्या साह्याने हे पात्र पार करावे लागते. त्याप्रमाणेच मोटारसायकली आणि घरगुती सामान देखील अशाच पद्धतीने जेसीबीच्या मदतीने नदी पार न्यावी लागतात. तालुक्याला जाताना आणि गावाकडे येताना प्रत्येकवेळी ही कसरत करावीच लागते. विशषत: पावसाळ्यात या गावाचा संपर्कच तुटतो, अशा वेळी एखादी आपत्ती निर्माण झाल्यास, किंवा रुग्णसेवेचे गरज निर्माण झाल्यास तालुक्याचा प्रवास अधिकच जीव घेणा वाटतो. रात्री अपरात्री नदी ओलांडणे धोक्याचे ठरते. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची प्रशासन वाट पहात आहे का असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.
करपरा नदीतून जीवघेणा प्रवास निवडणुका आल्या की जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार मतदानापूर्वीच केवळ आश्वासने देतात. मात्र, देश स्वातंत्र्यापासून होत असलेली बेलोरा गावकऱ्यांची पुलाची मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. पूल बांधण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाला निवेदने दिली. मात्र, त्याच्यावर कोणतीची कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच पुलाच्या मागणीची दखल घेऊन तत्काळ या नदीवर पूल उभारून ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी या ठिकाणचे रहिवासी करत आहेत.
-