परभणी- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळे सुरुवातीपासून आजपर्यंत सलून चालकांचा रोजगार बंद आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून, याविरोधात नाभिक समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र या आंदोलनास मज्जाव करण्यात आल्याने नाभिक समाजबांधवांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
कोरोनामुळे देशात 22 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये प्रशासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन केले. परभणी जिल्ह्यातील नाभिक व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाणे बंद ठेऊन प्रशासनाला सहकार्य केले. परंतु हा हातावर पोट असणाऱ्या नाभिक व्यावसायिकाच्या घरात असलेले राशनपाणी, पैसा-आडका होता, तो या तीन महिन्यात संपला आहे. त्यात सरकारकडून या व्यावसायिकांना आर्थिक स्वरुपात कुठलीही मदत मिळाली नाही. त्यामुळे नाभिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, रोजगाराअभावी जीवन कसे जगावे ? या विवंचनेतून इरळी येथील नवनाथ उत्तमराव साळुंखे या नाभिक व्यावसायिकाने आपल्या चार वर्षाच्या अजय नावाच्या मुलासह विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. हिच परिस्थिती संपूर्ण राज्यातील सलून व्यावसायिकांवर आली आहे.