परभणी - तालुक्यातील दैठणा येथे बँक फोडून तिजोरीतील पैसे लंपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींचा बँकेतून पैसे लंपास करण्याचा प्रयत्न फसला होता. त्यानंतर ते तेथून पसार होऊन पुणे आणि मुंबई या ठिकाणी लपून बसले होते. पोलिसांनी त्यांना दोन दुचाकी आणि चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यासह अटक केली आहे.
हेही वाचा... VIDEO : भररस्त्यात महिलेला मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद
परभणी तालुक्यातील दैठणा पोलीस स्टेशनमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेची बँक फोडून काही आरोपी फरार झाल्याप्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आले होते. तपासादरम्यान पथकाला बातमीदाराकडून चोरट्यांची माहीती मिळाली. त्यानुसार संशयित आरोपी गोविंद कठाळू काळे (रा. नळद ता. गंगाखेड) याने मुंबई येथुन तीन साथीदारांसह या बँकेत चोरी केल्याचे समजले.
या माहीतीवरून पोलिसांनी धसाडी येथून मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याजवळ विचारपुस केली असता त्याने चोरीची माहिती दिली. दैठणा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खिडकीचे गज काढून आत प्रवेश केला. त्यानंतर तिजोरीचे लाॅक तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी बँकेतील सायरन वाजल्याने तो आणि त्याचे साथीदार तेथुन पळून गेले, असे त्याने सांगितले.
हेही वाचा... मानसी नाईक यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्याला अटक,चार दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान, गोविंद याने त्याचे साथीदार संतोष आनंद हियाल (27 मुळ रा. रावलकेल्ला, ओडीसा सध्या रा. बांद्रा झोपडपट्टी मुंबई), विकास ऊर्फ बंटी सादरसिंग मिना (23 मुळ रा. मध्यप्रदेश सध्या रा. कोपरखैरणे, नालासोपारा झोपडपट्टी) आणि मंगेश उर्फ योगेश रूपलाल नागले (रा. गणेशपार जि. अमरावती, सध्या रा. नालासोपारा ईस्ट, मुंबई) हे असल्याचे सांगीतले. तसेच गोविंद काळे हा देखील सध्या मुंबईतील कोपरखैरणे येथे राहतो.
या सर्वांनी मिळून विविध ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली. त्यानुसार दैठणा, गंगाखेड, सोलापुर (ग्रामिण), लोणार (ग्रामिण), पुणे, लोणार शहर पोलीस ठाण्यात विविध दाखल आहेत. उर्वरीत आरोपींच्या चालू ठिकाणांची माहिती घेऊन पोलिसांनी दोघांना लोणावळा (जि. पुणे) येथील स्थानिक पोलीसांची मदतीने सापळा रचुन ताब्यात घेतले. तर एकाला मुंबईच्या नालासोपारा येथुन ताब्यात घेतले. या सर्व आरोपींनी दैठणा, गंगाखेड, सोलापुर, लोणावळा व अन्य काही ठिकाणी चोरी, घरफोडी केल्याचे कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेल्या दोन मोटर सायकल आणि घरफोडी करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. तर आरोपींना दैठणा पोलीस ठाण्यात हाजर करण्यात आले आहे.