परभणी- शहरातील युनियन बँकेच्या व्यवस्थापकाचा दुबई येथे प्रवासादरम्यान कोरोनाग्रस्त मित्राशी संपर्क झाला होता. त्यानंतर हे व्यवस्थापक शहरात परतले. गेल्या दहा दिवसांपासून ते बँकेत सेवा बजावत होते. ही माहिती समजताच प्रशासनाचे धाबे दणाणले, त्यामुळे तत्काळ व्यवस्थापकासह बँकेच्या १० कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे.
बँकेतील सर्व संशयित कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून लवकरच त्यांचे अहवाल येणार आहे. त्यानंतर पुढची कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले. शहरातील वसमत रोडवर युनियन बँक आहे. याठिकाणी व्यवस्थापकासह इतर १० कर्मचारी कार्यरत आहेत. दरम्यान, या ठिकाणचे व्यवस्थापक धुळे येथून प्रतिनियुक्तीवर आलेले आहेत. मात्र, धुळे येथे असताना ते दुबईला गेले होते. दुबई दौऱ्यात त्यांचा ज्या मित्राशी संपर्क आला, त्या मित्राला कोरोना असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, त्यांच्या संपर्कात राहणाऱ्या या व्यवस्थापकांना देखील धोका असण्याची शक्यता आहे.
ही बाब समजल्यानंतर प्रशासनाने तत्काळ बँकेत धडक देऊन कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, याठिकाणी सातच कर्मचारी आढळून आले. बँकेतील ३ कर्मचारी नांदेडला गेले आहेत. त्यामुळे, नांदेडच्या जिल्हाधिकार्यांना यासंदर्भात कल्पना देऊन ३ कर्मचाऱ्यांवर उपचार करण्याच्या सूचना दिल्याची माहिती जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिली आहे. शिवाय, शहरातील सातही कर्मचार्यांचे आपापल्या घरी विलगीकरण करण्यात आले असून, जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि कर्मचारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.