परभणी -आज (बुधुवार) राज्यात दहावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये परभणी जिल्ह्याचा दहावीचा निकाल यंदा मोठ्या प्रमाणात घटला आहे. हा निकाल औरंगाबाद विभागात अखेरच्या म्हणजेच पाचव्या स्थानावर आहे. दरम्यान, जिल्ह्यातील परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 88.48 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे मुलांपेक्षा मुलींचा निकाल आठ टक्कांनी अधिक लागला आहे. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी 95.1 तर मुलांची 87.15 टक्के आहे.
यंदा दहावीच्या परीक्षेसाठी परभणी जिल्ह्यातील 32 हजार 73 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील प्रत्यक्ष 31 हजार 777 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील विशेष प्राविण्यासह 7 हजार 429 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर प्रथम श्रेणीत 8 हजार 447, द्वितीय श्रेणीत 7 हजार 169 आणि सर्वसाधारण श्रेणीत 4 हजार 766 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण 28 हजार 11 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा हा निकाल 88.48 टक्के इतका लागला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांमधील निकालाच्या परंपरेप्रमाणे जिल्ह्यातील मुलींनी यावर्षीही आपली वरचढ गुणवत्ता कायम राखली आहे. मुलांच्या तुलनेत तब्बल आठ टक्क्यांनी मुली सरस ठरल्या आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 87.15 इतके असताना मुली मात्र 95.1 टक्क्यांवर पोहोचल्या आहेत.