परभणी - गेल्या काही दिवसांपासून कागदपत्रांची तपासणी करत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने शहरातील रिक्षा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात येत आहेत. दरम्यान, यामुळे रिक्षाचालकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होत असून याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे निवेदन करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबईत सोमवारी सकाळी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक होणार असून यामध्ये सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री रावते यांनी दिली. यामुळे ही कारवाई थांबणार असल्याने रिक्षाचालकांनी देखील सोमवारी नियोजित असलेला संप मागे घ्यावा, असे आवाहन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले आहे.
रिक्षाचालकांनी संप करू नये, सकारात्मक निर्णय घेणार - आमदार डॉ. राहुल पाटील - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मागील काही दिवसांपासून कागदपत्रांच्या तपासणीत शहरातील रिक्षा चालकांवर रिक्षा जप्तीचे मोठे संकट उभे राहिले आहे. यामुळे रिक्षा चालकांनी संप पुकारला आहे. मात्र, डॉ. राहुल पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे यासंदर्भात केलेल्या पाठपुरवठ्यानंतर ही प्रश्न निकालात निघण्याचे चिन्हे दिसत आहेत.
परभणी शहरात गेल्या काही दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतूक आणि इतर कागदपात्रांची तपासणी करत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. वाहतुकीला शिस्त लागावी या उद्देशाने ही कारवाई होत आहे. परंतु यामध्ये गोरगरीब आणि दररोज कमवून खाणाऱ्या रिक्षाचालकांची वाहने मोठ्या प्रमाणात पकडण्यात येत आहेत. अनेकांकडे ठराविक कागदपत्रे असली तरी काही कागदपत्रे नसल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे. मात्र, सद्यस्थितीत रिक्षाचालकांना दिलासा देण्यात यावा, त्यांना त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी काही वेळ मिळावा, यासाठी त्यांच्यावरील ही कारवाई तूर्तास थांबवावी. त्यांना पुढील तीन महिन्यात ही कागदपत्रे जमा करण्याची संधी द्यावी, अशी मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे लावून धरली आहे. यासंबंधीचे लेखी निवेदनही त्यांनी दिले आले. तसेच यासंदर्भात ते मागील दोन दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
सोमवारी मंत्रालयात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशाने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत रिक्षाचालकांच्या संबंधित कारवाईवर सकारात्मक निर्णय घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे परभणीतील रिक्षाचालकांची या कारवाईतून सुटका होणार आहे. त्यामुळे रिक्षा संघटनांनी पुकारलेला सोमवारचा संप आणि काढण्यात येणारा मोर्चा रद्द करावा. तसेच जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार डॉ.राहुल पाटील व शिवसेना ऑटो संघटना अध्यक्ष संभानाथ काळे यांनी केले आहे.