महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महामंडळाच्या बसेसवर 'संभाजीनगर'च्या पाट्या - bjp on aurangabad name change

परभणी शहरातील बसस्थानकात येऊन कार्यकर्त्यांनी महामंडळाच्या बसेसवर औरंगाबाद नव्हे केवळ छत्रपती संभाजीनगर अशा आशयाच्या पाट्या लावल्या.

bjp Activists Changed the aurangabad st bus name plate in parbhani
महामंडळांच्या बसेसवर 'संभाजीनगर'च्या पाट्या

By

Published : Jan 13, 2021, 7:31 AM IST

परभणी - मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतरण करण्याच्या मागणीसाठी भाजपाची कामगार आघाडी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. परभणी शहरातील बसस्थानकात येऊन कार्यकर्त्यांनी महामंडळाच्या बसेसवर औरंगाबाद नव्हे केवळ छत्रपती संभाजीनगर अशा आशयाच्या पाट्या लावल्या. या वेळी 'छत्रपती संभाजी महाराज की जय, भाजपा कामगार आघाडीचा विजय असो', अशा घोषणा देण्यात आल्या.

नामांतरावरून महाविकास आघाडीत सुरू आहेत वाद -
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून वाद पेटला आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मुद्दा प्रतिष्ठेचा आहे. संभाजीनगर हे नाव शिवसेनेनेच औरंगाबादला दिले असून, या नामांतरासाठी शिवसेना गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. मात्र, आता सत्तेत आल्यानंतर सुद्धा शिवसेनेला हे नामांतरण करणे अवघड जात आहे. कारण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे.

महाराष्ट्राच्या जमिनीवरील हे नाव तात्काळ काढले पाहिजे -
दुसरीकडे भाजपकडून मात्र औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे, अशी मागणी घेऊन सरकारच्या अडचणी वाढविण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी परभणीत भाजपाच्या कामगार आघाडीने परभणीच्या बस स्थानकात जाऊन आंदोलन केले. यावेळी छत्रपतींचे राज्य हे समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देणारे राज्य होते. परंतु दुर्देवाने या मराठी मुलखात परकीय तथा मुगल असलेल्या औरंगजेबच्या नावे औरंगाबाद शहर वसविले गेले. महाराष्ट्राच्या जमिनीवरील हे नाव तात्काळ काढले पाहिजे, अशी मागणी तमाम शिवभक्तांची आहे, असे सांगत भाजपा कामगार आघाडीतर्फे औरंगाबाद नव्हे केवळ संभाजीनगर अशा आशयाचे फलक राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस वर लावण्यात आले.

हे आंदोलक झाले होते सहभागी -
या आंदोलनात भाजपा सरचिटणीस दिनेश नरवाडकर, संजय रिझवाणी, भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष रोहित जगदाळे, संतोष जाधव, कामगार आघाडीचे सरचिटणीस मनोज देशमुख, शुभम शास्त्री, अभिजित मंगरूळकर, निरज बुचाले, विठ्ल बेनशेळकीकर, सुनील ढसाळकर, गणेश कोपे, माऊली कोपरे, रोहन बागल आदी भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details