महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रवाशाच्या सतर्कतेमुळे परभणीच्या दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न फसला - अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न

परभणी शहरातील आनंद नगरजवळील गुलजार कॉलनी परिसरात राहणाऱ्या अल्फिया कलीम शेख(वय, 11) आणि सायना शेख(वय, 11) या दोन मुली गुरुवारी सायंकाळी घरासमोर खेळत असताना अचानक गायब झाल्या.

दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न फसला
दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

By

Published : Nov 29, 2019, 8:22 PM IST

परभणी -दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांना रेल्वेने पळवून नेण्याचा प्रयत्न फसला. एका अज्ञात पुरुषाने दोन महिलांच्या सहाय्याने हा डाव रचला होता. मात्र, रेल्वेतील एका प्रवाशाच्या सतर्कतेमुळे हा अपहरणाचा डाव उघडकीस आला. मनमाड रेल्वे स्थानकावर परभणीच्या या दोन मुलींना सोडून अपहरणकर्त्यांनी पळ काढला.


परभणी शहरातील आनंद नगरजवळील गुलजार कॉलनी परिसरात राहणाऱ्या अल्फिया कलीम शेख(वय, 11) आणि सायना शेख(वय, 11) या दोन मुली गुरुवारी सायंकाळी घरासमोर खेळत असताना अचानक गायब झाल्या. पालकांनी मुलींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, मुली सापडल्या नाहीत. त्यामुळे घाबरलेल्या आई-वडिलांनी नानालपेठ पोलीसांकडे मुली हरवल्याची नोंद केली. त्यानंतर पोलिसांनी ही माहिती विविध यंत्रणांना दिली. रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली.

हेही वाचा - 60 गुन्हे करणाऱ्या सोनसाखळी चोरला अटक; सोने विकत घेणाऱ्या ज्वेलर्सवरही कारवाई
परभणी रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण रेल्वेची यंत्रणा कार्यान्वित केली. या दोन मुली परभणीतून देवगिरी एक्सप्रेसने रात्री मुंबईकडे गेल्या असल्याची माहिती मिळाली.


दरम्यान, मध्यरात्री तीनच्या दरम्यान गाडीतील प्रवासी नईम शेख (रा.अकोला) यांनी त्या दोन मुलींची चौकशी केली. नईम शेख यांना मुलींनी आपली नावे सांगितली. गुंगीचे औषध देऊन सोबतच्या दोन महिला आणि एका अनोळखी पुरुषाने अपहरण करून आणल्याचे सांगितले. त्यानंतर नईम यांनी मनमाड रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना बोलावून या घटनेची माहिती दिली. तोपर्यंत अपहरण करणाऱया व्यक्ती तेथून पसार झाल्या.


या दोन्ही मुलींना रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आले. रेल्वे पोलिसांनी ही माहिती परभणी रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना दिली. शुक्रवारी सकाळी मुलींच्या पालकांनी मुलींची भेट घेतली. सतर्क सहप्रवासी आणि मनमाड रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांमुळे या दोन्ही मुलींचे अपहरण टळले.

ABOUT THE AUTHOR

...view details