महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीच्या 'एटीएस'ची तीन भंगार विक्रेत्यांविरुद्ध कारवाई - ats

एटीएस पथकाकडून सेलू शहरातील स्क्रॅप, भंगार व्यावसायिकांच्या दुकान आणि गोदामांची तपासणी करण्यात आली. यात 3 भंगार व्यावसायिकांकडे त्यांनी खरेदी-विक्री केलेल्या मालाची नोंद रजिष्टरमध्ये सापडली नाही. तसेच आधार नंबर घेतलेलेही दिसून न आल्याने त्यांच्याविरुद्ध एटीएसने कारवाई केली आहे.

ats
एटीएस

By

Published : Dec 4, 2019, 10:39 PM IST

परभणी - दहशतवादी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार व्यवसाय तसेच इंटरनेट कॅफेचा वापर होत असल्याचे आत्तापर्यंत अनेक वेळा निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर परभणीच्या एटीएस पथकाकडून जिल्हाभरातील भंगार व्यवसायिकांच्या तपासण्या सुरू आहेत. यामध्ये आज(बुधवार) कुठल्याही प्रकारचा रेकॉर्ड न ठेवणाऱ्या सेलू येथील 3 भंगार व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल करत 'एटीएस'ने कारवाई केली आहे.

'एटीएस'ची कारवाई

या संदर्भात पोलीस अधीक्षक कृष्णकान्त उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे दहशतवाद विरोधी पथकाने यापूर्वीच जिल्ह्यातील नेट कॅफे, लॉजचालक, भंगार विक्रेते यांची तपासणी करून त्यांना नोटीस देऊन रेकॉर्ड ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरी देखील अनेकजण याकडे दुर्लक्ष करत असल्याने एटीएस पथकाने कारवाईचा बडगा उचलला आहे. या पार्श्वभूमीवर 'एटीएस'चे पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले यांच्या नेत्तृत्वाखाली एटीएस पथकाने सेलू शहरातील स्क्रॅप तथा भंगार व्यावसायिकांच्या दुकान आणि गोदामांची तपासणी केली. तेव्हा भंगार व्यावसायिक शेख अन्वर अत्तार (आवेस स्क्रॅप मर्चट), शेख शकील अत्तार (केजीएन स्कॅप सेंटर) आणि शेख गौस शेख गुलजार (स्टार स्क्रॅप सेंटर) यांच्या भंगार दुकानांमध्ये त्यांनी खरेदी-विक्री केलेल्या मालाची नोंद रजिष्टरमध्ये सापडली नाही. तसेच आधार नंबर घेतलेले दिसून आले नाहीत. त्यामुळे देण्यात आलेल्या सूचनांचे व आदेशाचे त्यांनी पालन केले नसल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला.

हेही वाचा - 'महापोर्टल'च्या परीक्षेदरम्यान कॉपीचा प्रकार, परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी तीनही दुकानदारांविरुध्द सेलू पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. दरम्यान, शहरातील सर्व भंगार विक्रेते, लॉजचालक, नेट कॅफे चालक, जुने वाहन विक्रेते यांनी आपल्या खरेदी व विकलेल्या मालाची सविस्तर नोंदी ठेवावी, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राजू शेट्टींना कृषिमंत्री करा- रसिका ढगे

ABOUT THE AUTHOR

...view details