महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 1, 2020, 1:35 PM IST

Updated : Nov 1, 2020, 5:57 PM IST

ETV Bharat / state

निधीवरून अशोक चव्हाणांचा सरकारला घरचा आहेर; विरोधकांची टीका तर, सेनेची सारवासारव

परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या रस्त्यांची पाहणी करण्यासाठी व काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी अशोक चव्हाण परभणीत आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी महानगरपालिकांना मिळणाऱ्या निधीबाबात वक्तव्य केले. त्यानंतर आता राजकीय चर्चा रंगली आहे.

Ashok Chavan
अशोक चव्हाण

परभणी -'राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे, त्यामुळे काँग्रेसची सत्ता असलेल्या महानगरपालिकांना पैसा मिळत नाही', अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेस पक्ष संपला असता, त्यामुळे आम्ही 90 टक्के आमदारांनी आग्रह धरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी तयार केल्याचे देखील अशोक चव्हाण म्हणाले. यावर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. तर, शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी याबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

परभणीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अशोक चव्हाण

काय म्हणाले होते अशोक चव्हाण -

परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या रस्त्यांची पाहणी करण्यासाठी व काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी अशोक चव्हाण आले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसची सत्ता असलेल्या महानगरपालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. नांदेडलाही निधी मिळाला नाही. मात्र, मी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिल्याचे विधान अशोक चव्हाण यांनी केले होते.

सरकारच्या अंतर्गत 'सुसंवादा'मुळे विकासकामांकडे दुर्लक्ष -

काँग्रेसच्या महानगरपालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. नांदेडलाही निधी मिळाला नाही. मात्र, आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला, असे अशोक चव्हाण म्हणाले होते. यातून महाविकास आघाडीमध्ये विसंवाद असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. यापूर्वीही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि विकास कामातील निधी वाटपावरूनच महाविकार आघाडीच्या मंत्र्यांमध्ये वाद आहेत. या सर्व गोंधळात जनतेकडे मात्र, दुर्लक्ष होत आहे. त्यांच्या अंतर्गत वादामुळे सामान्य जनता भरडली जात आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

संजय राऊत म्हणतात -

अशोक चव्हाण यांनी परभणीत केलेल्या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण जे बोलले त्याच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा थेट संबंध येत नाही. हा विषय कॅबिनेटचा आहे आणि तो कॅबिनेटच्या बैठकीत सुटू शकतो.

मुख्यमंत्र्यांनी कधीही भेदभाव केला नाही, शिवसेनेची सारवासारव -

संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे. महाविकास आघाडीचे संपूर्ण कुटुंब माझे आहे, हे समजून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला समान न्याय देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कोणावर अन्याय करणे हे त्यांच्या कधी स्वप्नातही आले नसेल. त्यांनी इतर सर्व अधिकार हे मंत्र्यांच्याच हातात दिलेले आहेत, हा त्यांचा मोठेपणा आहे. संपूर्ण देशात एकमेव मुख्यमंत्री असे आहेत, की त्यांनी स्वतःकडे कोणतेही अधिकार ठेवलेले नाहीत. सत्तेचे विकेंद्रीकरण काय असते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलेले आहे. आदरणीय अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. आमचा जेवढा मुख्यमंत्र्यांवर अधिकार आहे. त्याच्या अनेक पटींनी अशोक चव्हाणांचा मुख्यमंत्र्यांवर अधिकार आहे. अशोक चव्हाणांनी एखादी गोष्ट मुख्यमंत्र्यांना सांगितली तर ती मुख्यमंत्री कधीच करू शकत नाहीत, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी दिले आहे.

Last Updated : Nov 1, 2020, 5:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details