परभणी- जिल्हा प्रशासनाने चार दिवसांपुर्वी काही भागात दोन ते अडीच तास कृत्रिम पाऊस पडल्याचा दावा केला होता. मात्र प्रशासनाने नंतर दिलेल्या पावसाच्या आकडेवारीवरून तो दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे परभणी जिल्ह्यात झालेल्या कृत्रिम पावसाचा प्रयोग फसल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा - पाटील घराण्यावर टीका करताना पवारांचे अश्लील हावभाव
एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात धो-धो पाऊस पडत आहे. पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भातील काही भागात तर महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचवेळी मराठवाड्यात मात्र अवर्षणामुळे नागरिक तसेच शेतकरी त्रस्त झाले आहेत. परभणी जिल्ह्याची 774.62 मिलिमीटर एवढी पावसाची सरासरी नोंद आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ 452 मिलिमीटर पाऊस पडला आहे. आत्तापर्यंत पावसाळ्यात 637 मिलिमीटर पाऊस पडायला हवा. मात्र त्यापैकी केवळ 71 टक्के आणि वार्षिक सरासरीच्या फक्त 58.4 टक्के एवढाच पाऊस झाला आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसात तब्बल 42 टक्के पावसाची गरज आहे. अन्यथा परभणी जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर होण्याचे चिन्ह आहेत.
परभणी जिल्ह्यात प्रशासनाकडून शनिवारी 14 सप्टेंबर रोजी कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न झाला. मात्र हा कृत्रिम पावसाचा प्रयोग फसला. त्यादिवशी जिल्हा प्रशासनाकडून परभणी जिल्ह्यातील गंगाखेड आणि परभणी तालुक्यात पाऊस पाडणारे विमानाने घिरट्या घातल्या. गंगाखेड तालुक्यात आणि परभणी तालुक्यातील साळापुरी, पोखर्णी आणि कडगाव भागात कृत्रिम पाऊस पाडल्याचे प्रशासनाने सांगितले. विशेष म्हणजे साळापुरी आणि पोखर्णी येथे तर अनुक्रमे दोन ते अडीच तास पाऊस पडल्याचे सांगण्यात आले. हा पाऊस खरच पडला असता तर प्रशासनाने दुसऱ्या दिवशी सकाळी दिलेल्या आकडेवारीत याची नोंद झाली असती. परंतु प्रत्यक्षात परभणी तालुक्यात त्यादिवशी शून्य मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. यावरून प्रशासनाचा हा दावा किती खोटा आहे, हे लक्षात येते. एकीकडे अवर्षणाने हैराण झालेल्या शेतकऱ्याला पावसाची नितांत आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत प्रशासन मात्र असे फसवे प्रयोग करून शेतकरी आणि सामान्यांच्या भावनेशी खेळत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.