परभणी -जिल्ह्यात वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या संचारबंदीत आणखी 5 दिवसांची वाढ केली आहे. त्यानुसार येत्या सोमवारी (5 एप्रिल) सकाळी 6 वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी कायम असणार आहे.
हेही वाचा -परभणीच्या संचारबंदीत फक्त दुकाने बंद; रहदारी सुरूच
रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ
या संदर्भात जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आज (बुधवारी) दुपारी काढलेल्या आदेशात या संचारबंदीची घोषणा केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. कोरोनाची ही साखळी तुटावी यासाठी उपाययोजनांचा एक भाग म्हणून यापूर्वी गुरुवारी (1 एप्रिल) सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली होती. मात्र, रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने संचारबंदी कालावधीत वाढ करण्यात आली असून, सोमवारी (5 एप्रिल) सकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे.
हेही वाचा -परभणीत 'लॉकडाऊन'ला कडाडून विरोध; परिस्थिती पाहून निर्णय घेण्यावर जिल्हाधिकारी ठाम
यापूर्वी सूट दिलेल्या बाबींना या संचारबंदीतून सूट
ज्या बाबींना तसेच अस्थापनांना आणि अत्यावश्यक बाबींना यापूर्वी सूट दिली आहे, त्या सर्व बाबी, अस्थापना सुरू राहतील. शिवाय ज्या अस्थापना, दुकाने यांना सूट दिली नाही, ती बंदच राहतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारित आदेश, निर्देश या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात अंमलात राहतील, असेही जिल्हाधिकार्यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.