परभणी - 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील विविध आस्थापना तथा दुकानदारांना आठवड्यातील प्रत्येकी तीन-तीन दिवस आपला व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, यामुळे बाजारात होणारी गर्दी पाहता आणि व्यापाऱ्यांचा बुडणारा व्यवसाय लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारसह तीन दिवसांसाठी यापूर्वी परवानगी दिलेल्या सर्व आस्थापनांना आपला व्यवसाय पूर्णवेळ सुरू ठेवण्यासाठी सूट दिली आहे.
परभणीत सर्व आस्थापनांना तीन दिवसांसाठी व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी
जिल्हा व्यापारी महासंघाने खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वात सर्व आस्थापनांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत आठवडाभर व्यवसाय करण्याची परवानगी देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. याउपर जिल्हाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारपासून पुढील दोन दिवस असे एकूण तीन दिवस सर्व व्यापाऱ्यांना आपली आस्थापने उघडी ठेवून व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे.
या संदर्भात गुरुवारी परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यासह जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेतली. तसेच, सर्वच व्यवसायांना नियम व अटी अंतर्गत दुकाने पूर्णवेळ उघडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. गेल्या महिनाभरापासून परभणी जिल्ह्यात आठवड्यातील तीन दिवस कपडा, इलेक्ट्रॉनिक आदींसह इतर व्यवसायिकांना सोमवार ते बुधवार सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची सूट दिली होती. तसेच कटलरी, क्रॉकरी, भांड्याची दुकाने, पुस्तके व इतर काही दुकानदारांना गुरुवार ते शनिवार असे तीन दिवस व्यवसाय करण्याची परवानगी दिली होती. यामुळे आठवड्यातून केवळ 3 दिवस दुकाने उघडी राहत असल्याने ग्राहकांची गर्दी बाजारात मोठ्या प्रमाणात दिसून येत होती. ज्यामुळे सोशल-डिस्टन्सिंगचा फज्जा उडत होता.
याच पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी जिल्हा व्यापारी महासंघाने खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वात सर्व आस्थापनांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत आठवडाभर व्यवसाय करण्याची परवानगी देण्याची मागणी जिल्हाधिकारी मुगळीकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. याउपर जिल्हाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारपासून पुढील दोन दिवस असे एकूण तीन दिवस सर्व व्यापाऱ्यांना आपली आस्थापने उघडी ठेवून व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. या तीन दिवसात जिल्हा प्रशासनाकडून बाजारात गर्दी होते का? शिस्तीचे पालन होते का? सर्व नियम अटी पाळल्या जातात का? याची शहानिशा करण्यात येणार आहे. त्यानंतर सोमवारपासून पुढे सर्व व्यवसाय एकाचवेळी उघडे ठेवायचे का, की पूर्वीप्रमाणे आठवड्यातून तीन-तीन दिवस विभागून दुकानदारांना आपली दुकाने उघडण्याची परवानगी द्यायची, याचा निर्णय घेतल्या जाणार आहे. एकूणच जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच पूर्णवेळ आणि आठवडाभर दुकाने उघडी राहिल्यास ग्राहकांची गर्दी देखील कमी होईल आणि आम्ही देखील सोशल डिस्टन्सिंगचे पालन करू, अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.